ॲड. निता सावंत-कविटकर यांची माहिती
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ल्यात रक्तदान, वृक्षवाटप, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपसहित विविध उपक्रम
सावंतवाडी :
शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिन्ही तालुक्यांमध्ये लोकपयोगी उपक्रम राबवून हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर १८ ऑगस्ट २०२६ रोजी नगरसेवक देव्या सूर्याजी, मित्रमंडळ, युवा रक्तदाता संघटना तसेच शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुविधेसाठी पंखे वाटप करण्यात येणार असून, लाखो वस्तीतही पंखे वाटप करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यांमध्ये सुमारे ५ हजार वृक्षांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप तसेच गरजूंना छत्र्यांचे वाटप केले जाणार आहे.
रोणापाल येथील निराधार मुलांच्या छात्रालयामध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला जाणार आहे. तसेच कोंडुरा येथील विशेष शाळेत फळवाटप, आरोंदा येथील शाळांमध्ये वह्या वाटप आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले.
१९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मुख्य वाढदिवस सोहळा केक कापून साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, या माध्यमातून समाजोपयोगी कार्याचा संदेश दिला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सभापती सुष्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, माजी सभापती अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नारायण राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, झेवियर फर्नांडिस, परिक्षित मांजरेकर, शरद धाऊसकर, नगरसेवक शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, महिला शहरप्रमुख भारती मोरे, स्नेहा टीळवे, राजन रेडकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, विनोद नाईक, क्लेटस फर्नांडिस, सचिन साटेलकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
