स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान
वेंगुर्ले
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वजराठ येथील माजी सैनिक कॅप्टन प्रताप शिवराम राणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी त्यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना बाळू देसाई म्हणाले, “देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना सैनिकांनी केलेला त्याग आणि समर्पण शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. त्यांच्या शौर्यामुळे आणि बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत सुरक्षित जीवन जगत आहोत. माजी सैनिकांचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नसून राष्ट्रसेवेला नमन करण्याची संधी आहे. त्यांच्या देशसेवेची प्रेरणा नव्या पिढीने घेऊन राष्ट्रहिताला सदैव प्राधान्य द्यावे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविले जातील.”
देशाच्या संरक्षणासाठी आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण काळ समर्पित करणाऱ्या सैनिकांमुळेच नागरिक सुरक्षित वातावरणात जीवन जगत आहेत. सैनिकांचे शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा ही समाजासाठी प्रेरणादायी असून माजी सैनिकांचा सन्मान हा देशसेवेच्या मूल्यांचा गौरव असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमातून समाजात राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच नव्या पिढीसमोर सैनिकांच्या त्यागाची आणि देशसेवेची प्रेरणादायी परंपरा पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी माजी सरपंच सूर्यकांत परब, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत परब, तालुका चिटणीस नितीन चव्हाण, वामन भोसले, माजी सरपंच महेश राणे, उपसरपंच दीपिका राणे, पांडुरंग राणे, चंद्रकांत राणे, सुरेश राणे, नंदकिशोर राणे, श्यामसुंदर मांजरेकर यांच्यासह श्री. राणे कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.
