IT इंजिनिअर मुलीने नोकरी सोडली, फोंडाघाटमध्ये उभारले स्वतःचे कॅफे!
पिझ्झा-बर्गरपासून वडा-पावपर्यंत चविष्ट पदार्थांची मेजवानी; स्वच्छता अन् दर्जामुळे ‘वक्रतुंड कॅफे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
फोंडाघाट :
प्रतिनिधी फोंडाघाट-घोंसरी रोडवर नव्याने सुरू झालेल्या ‘वक्रतुंड कॅफे’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पिझ्झा, बर्गर, कॉफीपासून सर्वसामान्यांच्या आवडीचा वडा-पावही येथे उपलब्ध असून, चव आणि स्वच्छतेमुळे हे कॅफे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
अभिजित सावंत यांच्या मुलाने आणि मुलीने वडिलांच्या पाठिंब्याने हे कॅफे सुरू केले आहे. नुकतेच एका बैठकीसाठी येथे भेट देण्याचा योग आला. यावेळी बर्गर आणि कॉफीची ऑर्डर दिली असता, दोन्ही पदार्थांची अप्रतिम चव आणि उत्तम दर्जा अनुभवायला मिळाला.
विशेष म्हणजे, कॅफेची जबाबदारी सांभाळणारी सावंत यांची मुलगी IT इंजिनिअर असून पुण्यातील कोथरूड येथे नोकरीला होती. मात्र स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा असल्याने तिने नोकरी सोडून फोंडाघाटमध्ये परत येत कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला वडिलांनी भक्कम पाठिंबा दिला आणि त्यातून एक सुंदर व दर्जेदार कॅफे फोंडाघाटमध्ये सुरू झाला.
अभिजित सावंत यांचा मुलगा वेटलिफ्टर असून नुकत्याच झालेल्या स्पर्धेत त्याने तब्बल ३०० किलो वजन उचलण्याचा विक्रम केला आहे. मुलांच्या मेहनतीला आणि त्यांच्या जिद्दीला वडिलांची मिळालेली साथ निश्चितच कौतुकास्पद आहे.
अभिजित सावंत हे माझे मित्र असून त्यांनी आपल्या मुलांना दिलेले संस्कार, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दिलेले प्रोत्साहन आणि पाठिंबा निश्चितच अभिमानास्पद आहे. विशेष उल्लेख करावा अशी बाब म्हणजे ‘वक्रतुंड कॅफे’मधील स्वच्छता. कॅफेमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण मनाला आनंद देणारे आहे.
चव, स्वच्छता, दर्जा आणि तरुणांची मेहनत यांचा सुंदर संगम असलेले ‘वक्रतुंड कॅफे’ फोंडाघाटच्या खाद्यप्रेमींसाठी नक्कीच एक नवा आणि चांगला पर्याय ठरत आहे.
