You are currently viewing यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मानासाठी अर्जांचे आवाहन

यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मानासाठी अर्जांचे आवाहन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान’ यंदा २६व्या वर्षात पदार्पण करत आहे. १ ऑक्टोबर ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’चे औचित्य साधून हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी १ जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्रभरातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथील मुख्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सेवानिवृत्तीनंतरही अनेक ज्येष्ठ नागरिक अनुभव, ज्ञान आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी योगदान देणाऱ्या अशा समाजाभिमुख कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेणे हा या कृतज्ञता सन्मानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करून इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो.

या राज्यस्तरीय सन्मानाच्या वैयक्तिक विभागासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक तृतीयपंथी व्यक्ती आणि एक दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्थेसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय सन्मान देण्यात येणार आहे. वैयक्तिक तसेच संस्थात्मक स्तरावर समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिकांचा आणि संघटनांचा यामध्ये गौरव करण्यात येईल. सन्मानित मान्यवरांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि सन्मान निधी प्रदान करण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण सेंटरने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि प्रसारमाध्यमांना या उपक्रमाची माहिती अधिकाधिक पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सामाजिक माध्यमे आणि इतर माध्यमांतून या आवाहनास व्यापक प्रसिद्धी देण्याची विनंती करण्यात आली आहे. वैयक्तिक तसेच ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्थेसाठी ऑनलाइन आणि PDF अर्ज उपलब्ध आहेत. पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज टपालाने किंवा कुरिअरने पाठवावा. ई-मेल, व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमातून पाठविलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्जासाठी वैयक्तिक आणि ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्थेसाठी ऑनलाइन तसेच PDF अर्ज उपलब्ध आहेत. वैयक्तिक ऑनलाइन अर्ज: https://chavancentre.org/announcement/call-for-applications-for-the-yashwantrao-chavan-state-level-gratitude-award-for-senior-citizens ; वैयक्तिक PDF अर्ज: https://chavancentre.org/images/PDF/1_Application_Form_2026_F.pdf ; ज्येष्ठ नागरिक संघ / संस्था ऑनलाइन अर्ज: https://chavancentre.org/announcement/call-for-applications-for-the-yashwantrao-chavan-senior-citizens-association-organization-state-level-gratitude-award ; संघ / संस्था PDF अर्ज: https://chavancentre.org/images/PDF/2_Application_Form_2026_F.pdf.

अधिक माहितीसाठी मनिषा खिल्लारे यांच्याशी ०२२-२२०४५४६० / ०२२-२२०२८५९८ (विस्तारित क्र. २२४) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. कार्यालयीन वेळ सोमवार ते शुक्रवार, सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० अशी आहे. या उपक्रमाची माहिती पात्र ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्थांपर्यंत पोहोचवून त्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती यशवंतराव चव्हाण सेंटरचे संयोजक विजय कान्हेकर आणि विभाग प्रमुख दिपिका शेरखाने, आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा