You are currently viewing आण्णासाहेब डांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार

आण्णासाहेब डांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त आष्टा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. डांगे यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले व त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. डॉ. डांगे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र टँकरमुक्त आणि कर्जमुक्त करण्याचे ध्येय घेऊन काम करणाऱ्या डॉ. डांगे आप्पांची कडक शिस्त, परखड मते आणि प्रचंड अभ्यास ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आपण कारसेवक आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना पक्षाची ध्येयधोरणे ठरविताना अण्णासाहेबांकडून खूप शिकायला मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

दुष्काळग्रस्त भागापासून दऱ्याखोऱ्यांतील वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी टँकरमुक्तीचा धाडसी निर्णय अण्णासाहेबांनी घेतला. हे शिवधनुष्य पेलण्याचे धैर्य त्यांनी दाखविले, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अण्णासाहेबांसोबत स्वतंत्र बैठक होऊन पुढील ध्येयधोरणे निश्चित होत असत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

कर्जमुक्तीचा अजेंडा लावून धरण्याचे श्रेय डॉ. डांगे यांना असल्याचे सांगत, त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. चौंडेश्वरी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. डांगे यांच्या परखड स्वभावाचा किस्सा सांगताना फडणवीस म्हणाले, एखादी गोष्ट न पटल्यास अण्णा ‘रामराम’ करून निघून जात; मात्र भाजप हा रामाचा जयघोष करणारा पक्ष असल्याने ते पुन्हा रामराम करत घरी परतले. शंभराव्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी याच मैदानावर येऊन शुभेच्छा देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. रामजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह डांगे परिवार, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील आमदार, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शैक्षणिक संकुलातील विविध नवीन इमारतींचे उद्घाटनही करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे भाऊ यांनी केले, तर आभार विश्वनाथ डांगे बापू यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा