सांगली / जत (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : जतचे नाव बदलून “देवभूमी जत” करण्याच्या मागणी विरोधात जत येथे आज ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित निषेध मोर्चात सहभाग दर्शवत निषेध व्यक्त केला. जतकरांच्या भावना, त्यांच्या अस्मितेचा आणि ऐतिहासिक ओळखीचा सन्मान व्हावा, हीच या मोर्चामागची प्रमुख भूमिका होती. नाव बदलण्याच्या राजकारणाविरोधात जतकरांनी रस्त्यावर उतरून आपली भूमिका स्पष्ट केली. हा मोर्चा केवळ नावाच्या विरोधाचा नाही, तर जतची ओळख, स्वाभिमान आणि अस्मिता जपण्यासाठीचा लढा आहे.
जत या नावाशी आपल्या मातीचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि असंख्य जतकरांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या इच्छेविरोधात जतचे नाव बदलण्याचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य नाही. जतकरांचा आवाज लोकशाही मार्गाने बुलंद करत, “जतचे नाव, जतच राहणार!” या भूमिकेसाठी शेवटपर्यंत ठामपणे आम्ही लढत राहू. अशी भूमिका घेण्यात आली.
यावेळी माजी आ. विलासराव जगताप, इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
