You are currently viewing पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील नागरिकांच्या अर्जांसंबंधी शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अनुपालनाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता घेणार आहेत. या अनुपालन सभेत दि. 30 जुलै रोजीच्या शासकीय जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी दिलेल्या अर्जावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून, असे अर्ज दिलेल्या नागरिकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मा. पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही अनुपालन सभा होणार आहे. नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी सोडवल्या जाव्यात, या उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. ३० जुलै रोजी शासकीय जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. नागरिकांच्या प्राप्त अर्जावर केलेल्या अहवालासह विभागप्रमुखांनी या सभेस उपस्थित राहण्यास सूचना देण्यात आल्या असून, संबंधित नागरिकांनीही या सभेस उपस्थित राहून आपल्या अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती घ्यावी, असे आवाहन मा. पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दुसरा शासकीय जनसंवाद कार्यक्रम आगामी कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, त्याची तारीख स्वतंत्ररीत्या कळवण्यात येईल. शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्न, नागरिकांच्या समस्या यांना या शासकीय जनसंवाद कार्यक्रमातून व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा