You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिरुद्ध देसाई
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिरुद्ध देसाई

रिझर्व्ह बँकेची मान्यता; पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी पदावर अनुभवी व कार्यक्षम अधिकारी श्री. अनिरुद्ध यशवंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीस रिझर्व्ह बँकेने दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये अधिकृत मान्यता दिली आहे. मान्यता मिळाल्यानंतर श्री. देसाई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री. अनिरुद्ध देसाई हे सहकार व बँकिंग क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २००४ ते २००८ आणि २०१० ते २०२२ या कालावधीत जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २०२२ ते २०२७ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

पुणे जिल्हा बँकेतील त्यांच्या कार्यकाळात कोअर बँकिंगची १०० टक्के अंमलबजावणी, नेट एनपीए शून्यावर आणणे, डिजिटल बँकिंगमध्ये राज्यात प्रथम क्रमांक, १२०० हून अधिक बचत गटांना कर्जपुरवठा, सहकारी संस्थांचे संगणकीकरण तसेच अवसायानातील संस्थांचे यशस्वी पुनरुज्जीवन यांसारखी महत्त्वपूर्ण कामगिरी झाली.

याशिवाय कोकणासाठी विशेष UPNRM प्रकल्प, SHG-बँक लिंकेज, कृषी पतपुरवठा वाढविणे, तसेच त्रिस्तरीय बँकिंग रचनेबाबत केंद्र व राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून कामकाज करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) या महत्त्वाच्या पदावरही त्यांनी कार्य केले असून, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, पतपुरवठा धोरण, कोअर बँकिंग अंमलबजावणी आणि ग्रामीण पतपुरवठा या विषयांवरील त्यांचे ज्ञान दांडगे मानले जाते.

श्री. अनिरुद्ध यशवंत देसाई यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत कामकाज सुरू होते. आता रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनंतर श्री. देसाई यांची पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अध्यक्ष मा. मनीष प्रकाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या साडेचार वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ४,४५७ कोटी रुपयांवरून ७,५३१ कोटी रुपयांपर्यंत, तर निव्वळ नफा १६ कोटी रुपयांवरून ५० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. बँकेला सलग ‘अ’ ऑडिट वर्ग तसेच राष्ट्रीय स्तरावरील सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या यशस्वी वाटचालीच्या पुढील टप्प्यात श्री. अनिरुद्ध देसाई यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे डिजिटल बँकिंगचा विस्तार, १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट, शेतकरी-केंद्रित पतधोरण आणि सहकारी संस्थांचे अधिक बळकटीकरण या क्षेत्रांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

“श्री. अनिरुद्ध देसाई यांच्यासारखा अनुभवी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लाभणे ही बँकेसाठी जमेची बाजू आहे. पुणे जिल्हा बँकेतील त्यांची उत्कृष्ट कामगिरी आम्ही पाहिली आहे. सिंधुदुर्गच्या सहकाराला आधुनिकतेची जोड देत राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्याच्या आमच्या ध्येयाला त्यांच्या अनुभवाची निश्चितच मोलाची साथ लाभेल. त्यांच्या नियुक्तीस रिझर्व्ह बँकेने मान्यता दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत,” असे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी सांगितले.

“सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आजची वाटचाल प्रेरणादायी आहे. मा. अध्यक्ष मनीष दळवी साहेब, संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बँकेला तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि शेतकरी हिताच्या त्रिसूत्रीवर आणखी पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील. १०० टक्के वसुली, नेट एनपीए शून्यावर आणणे आणि प्रत्येक सभासदापर्यंत डिजिटल बँकिंग सुविधा पोहोचविणे ही माझी प्रमुख प्राधान्ये असतील,” असे श्री. देसाई यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढील वाटचालीत अध्यक्ष मनीष दळवी यांच्या दूरदृष्टीला आणि श्री. अनिरुद्ध देसाई यांच्या प्रशासकीय अनुभवाला लाभलेली साथ ‘सहकारातून समृद्धीकडे’ या ध्येयाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा