“एक दिवस बळीराजासाठी – बांधावरची शाळा” उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला नाचणी लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव
विद्या मंदिर मांगवली नं. १ चा अभिनव उपक्रम; शेतभेटीतून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे
वैभववाडी प्रतिनिधी :
शासनाच्या “एक दिवस बळीराजासाठी – बांधावरची शाळा” या अभिनव उपक्रमांतर्गत विद्या मंदिर मांगवली नं. १ येथील विद्यार्थ्यांनी श्री. दिलीप राणे यांच्या शेताला भेट देत प्रत्यक्ष नाचणी लागवड करून शेतीचा अनोखा अनुभव घेतला.
शेतभेटीदरम्यान श्री. दिलीप राणे यांनी विद्यार्थ्यांना शेतीतील विविध अवजारे, पिकांची लागवड, शेतीची कामे तसेच कृषीविषयक विविध बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत प्रत्यक्ष अनुभवातून शेतीचे बारकावे जाणून घेतले.
या उपक्रमास मांगवली गावचे सुपुत्र तथा राज्यस्तरीय “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” प्राप्त प्रगतिशील शेतकरी महेश रामदास संसारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपक्रमाचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी विद्या मंदिर मांगवली नं. १ चे मुख्याध्यापक राहुल भाऊसाहेब नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता, श्रमप्रतिष्ठा, कृषीविषयक जागरूकता आणि शेतकऱ्यांविषयी आदरभाव निर्माण झाला. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, ग्रामीण शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
