You are currently viewing सावंतवाडीत १ ऑगस्टला ‘गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – २०२६’

सावंतवाडीत १ ऑगस्टला ‘गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – २०२६’

सावंतवाडीत १ ऑगस्टला ‘गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – २०२६’

३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांसह ४० पेक्षा अधिक शिक्षकांचा होणार सन्मान; शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती

सावंतवाडी,

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – २०२६’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपरिषद सभागृहात करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव, शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह १०० टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० हून अधिक शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, एकूण ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या सोहळ्यात होणार आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणे, उत्कृष्ट शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणे आणि शिक्षण संस्था, पालक व समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा