*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अनुपम सोहळा*
गळा तुळशीची माळ,
कपाळी बुक्का, हाती पताका, पालखी खांद्यावरी.
कीर्तनाचे धन,मुखी विठ्ठल नाम, ओळख फक्त “पंढरीचा वारकरी.”
विठू नामाचा गजर, जोडीला “ज्ञानोबा माऊली तुकाराम”, जयघोष करी.
ढोल,मृदंग,टाळ,चिपळ्या,गाती अभंग, जोड देई एकतारी. // १//
पावसाचे थेंब टपोरे,स्वागत करती, उघडून अत्तर कुपी मृदगंधाची.
दिंडी मागून दिंडी चालते, शिस्त वारीची,पावलांना ताकद भक्तीची.
टाकती विठ्ठलावर भार, नाही तमा ऊन, पाऊस, विंजण वाऱ्याची.
अडचणीत हाकेला,देईल ‘विठू माऊली ‘ओ’ ही अढळ निष्ठा,
भाविक भक्तांची //२//
संसारातून मुक्त होऊनी, बायकाही निघाल्या,तुळस डोईवरी,डोळे पंढरपुरी.
नाम घेता विठ्ठलाचे, सरतील पापे, लागेल नाव संसाराची पैलतीरी.
भजनी रंगता,कष्ट विसरती,
हेच शेतकरी, कष्टकरी ‘विठ्ठलाचे वारकरी’.
सुखरूपता सरकारची जबाबदारी जेवणखाण,औषधोपचाराची सोय
करीती यजमान गावकरी, //३//
विसरूनी अंहभाव,धर्मजात,रावरंक,
उच्चनीच,सानथोर,ही एकरुपता वारीची.
वारी म्हणजे,श्वास नामाचा,
अंतरीक समाधान,
नाही जत्रा धांगडधिंग्याची.
अश्वाचे रिंगण,फुगडी झिम्मा दावी, अनोखी यात्रा, सुसंस्कृत भारताची.
दिसे ‘मी’ पणाचा लोप,
दया, क्षमा, प्रेम संत
शिकवण,माणुसकी ची //४//
नामा,चोखा,कान्होपात्रा गोरा,जनाबाई ,ज्ञाना, पुंडलीक, तुका संतमंडळी.
त्यांचे हट्ट पुरवून,लाड करी, ‘विठूमाऊली,’ ती माया आगळी.
भक्तांनी व्यापले भूमंडळ,
देऊळी घंटा निनादती,
आली वारकऱ्यांची
मांदियाळी.
होईल जीवा-शीवाची भेट,चंद्रभागेतीरी,
नको राजकारण्यांची मनमानी देऊळी. //५//
पंढरीनाथा उठा झडकरी,
आज एकादशी साजरी करू, राऊळात भक्तांसंगे.
इंद्रायणी भीमा भामा ही आल्या करावया अभिषेक चंद्रभागेच्या संगे
गळा वैजयंती माळा,लेवून पितांबर बुक्का लावा
गंधा संगे,
चंद्रभागेतीरी,स्वागताला जाऊ,अलिंगन देऊनी,जेथे भावभक्ती मेळा रंगे . //६//
बघूनी लगबग विठाईची विठू गालात हसला आणि बोलला…
मी घेतो भक्तांची काळजी रखुमाई,सगळी माझीच असे करणी.
ओवाळून भाकर तुकडा,
वारकऱ्यांच्या पायावर घाला, कोमट दूध पाणी .
होईल थकवा दूर,
आनंदनिधान दिसता,
घेता विठाईच्या हातचे गुळपाणी.
भेटीचा क्षण आगळा,मनी प्रेमाचा जिव्हाळा,नाही वेळ जा झणी //७//
दिसतो एका डोळ्यात अश्रू आनंदाचा, दुसऱ्यात विरहाचा, भक्त भेटता
विठाई म्हणे,पुसा डोळे, आपण आलो महाद्वारी, वारकऱ्यांच्या स्वागता.
राहती समाधानी,खुणगाठ मनाशी,देतो विठ्ठल काही न मागता
जीव होतो कासावीस, पालख्या दूर पांगता, होते वारीची सांगता. //८//
*प्रतिभा फणसळकर*
मो.नं.7887862447
पुणे(सदाशिव पेठ)
