सावंतवाडीत ३१ जुलैला भव्य ‘महाराजस्व समाधान शिबीर’
पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांची उपस्थिती; नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच छताखाली
सावंतवाडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक दाखले तसेच आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिराला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या विशेष शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात येणार असून नागरिकांचे अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन करणे तसेच विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
