*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक ज्येष्ठ मालवणी साहित्यिक श्री विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*
*गुरुपौर्णिमेचा संकल्प*
आषाढ महिन्याचे तीन दिवस तसे आठवणीत असतात. कालिदास दिन, पंढरपूर यात्रा आणि गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा मात्र अलिकडेच अधिक साजरी होते. वीसेक वर्षात त्याला मोठं रूप आलंय. अध्यात्मिक संस्थामुळे हे घडलं असावं. बालपणी आम्हाला गुरुपौर्णिमा माहीत नव्हती. बाबा म्हणायचे, ‘ आज गुरुपौर्णिमा’ आणि ते देवापुढे काहीतरी गोडधोड ठेवायचे. दुसरे म्हणजे संघशाखेत गुरुपौर्णिमा साजरी व्हायची.
खरंतर त्याकाळी गुरुतुल्य शिक्षक लाभूनही आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात फारसे उत्सुक नव्हतो, आम्हाला हे माहीतच नव्हते. आता मात्र मंदिरात, मठात, अध्यात्मिक संस्थेत, संगीत क्लासमधे, कोचिंग क्लासमधे अशी सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी होते.
पैसे घेऊन मार्गदर्शन करायचे आणि गुरुपूजन करून घ्यायचे, हे थोडे जादाच वाटते. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो गुरू. पण बऱ्याचदा व्यावसायिक लोक पाय धुऊन घेताना दिसतात; तेव्हा धुणाऱ्यांची आणि धुऊन घेणाऱ्यांकडे मी आश्चर्याने पहातो.
गुरुकुल पद्धतीने कला,संगीत शिकवणारे थोरच आहेत. तसेच अध्यात्मिक अनुभव देणारेही थोर आहेत. पण व्यावसायिकात, आर्थिक देवाणघेवाणीत हे नसावे, असे मला वाटते.
व्यवसाय करणारे करो बापडे, ती त्यांची गरज असेल .परंतु आर्थिक स्थिती उत्तम असलेले समाजात अनेकजण आहेत. पण ते समाजाचं निरपेक्ष वृत्तीने भलं करत असतील, तर त्यांचे पाय धुवायला हरकत नाही किंवा असे पाय नेहमीच पूजनीय; पण हे कमी जाणवते.
केवळ शिक्षक नाही, तर सर्वच पेन्शनर्स नी समाजाच्या टॅक्स मधून मिळणाऱ्या आपल्या पेन्शनचा एक टक्का आणि रोज एक तास समाजाला द्यायला हरकत नसावी. तसे केल्यास हे लोक दिशादर्शक होतील, वंदनीय होतील; समाज त्यांना गुरू मानेल. गुरुपौर्णिमेनिमित्त असा संकल्प करायला हरकत नसावी.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
