You are currently viewing शिरोड्यात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वाढता उपद्रव; बाजारपेठ आणि रेडी बायपासवर अपघाताचा धोका

शिरोड्यात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वाढता उपद्रव; बाजारपेठ आणि रेडी बायपासवर अपघाताचा धोका

शिरोड्यात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वाढता उपद्रव; बाजारपेठ आणि रेडी बायपासवर अपघाताचा धोका

वाहतूक कोंडी, अपघातांची भीती वाढली; ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, ग्रामस्थांची मागणी

शिरोडा :

शिरोडा बाजारपेठ तसेच शिरोडा–रेडी बायपास मार्ग परिसरात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कोंडवाड्याची कमतरता असल्याने ही समस्या अधिकच बिकट बनल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मोकाट जनावरे बाजारपेठेत तसेच रेडी बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात वावरत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. विशेषतः रात्रीच्या वेळी रहदारीच्या ठिकाणी आणि धोकादायक वळणांवर दहा ते पंधरा जनावरे एकत्र बसलेली दिसतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी देवगड-जामसंडे येथे मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शिरोड्यातही अशीच दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जनावरांना त्यांचे मालक रस्त्यावर मोकळे सोडत असल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिरोडा ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून मोकाट जनावरांसाठी कोंडवाड्याची व्यवस्था करावी तसेच या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी जोरदार मागणी शिरोडा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा