*लेखक, कवी, पत्रकार विधीज्ञ रुपेश पवार लिखित सामाजिक लेख*
*निरंकुश शासन पद्धती आणि लोकक्रांती*
जगातल्या कोणत्याही लोकशाही देशात निरंकुश शासन पद्धतीने कोणताही सत्ताधारी पक्ष सरकार चालवत असेल तर कालांतराने जनतेत उद्रेक निर्माण होऊ शकतो. कारण देशाची राज्यघटनात्मक नैतिकता व संकेतात्मक अलिखित नैतिकता बाजूला ठेवून, एखादा सत्ताधारी पक्ष हुकूमशाही सदृश्य राजकीय सत्ता चालवत असेल तर त्यावेळी हळूहळू जनतेत देशातल्या सरकारविषयी तिरस्कार निर्माण होतो.
म्हणून जगातल्या कोणत्याही लोकशाही देशात एखाद्या राजकीय पक्षाचे दीर्घकाळ सरकार राहत नाही. आपत्तीग्रस्त परिस्थितीत किंवा युद्धजन्य परिस्थितीत देशातले सरकार आक्रमक विचारांचे असते तर सर्वसामान्य काळात शांत डोक्याने विचार करून निर्णय घेणारे सरकार असते. हे दोन सत्ता बदल जागतिक इतिहासात दिसून आले आहेत. अमेरिकेच्या राजकीय इतिहासात आपल्याला हे कायम दिसले आहे. त्यामुळे कोणत्याही देशाच्या सत्ताधारी पक्षाने निरंकुश होऊन सत्ता चालवू नये. अशाप्रकारच्या निरंकुश राजकीय अनैतिक विचारामुळे त्या सत्ताधारी पक्षाची राज्यनैतिक धोरणे व विकास कामे कुचकामी ठरतात. लोक त्या सरकारच्या सकारात्मक गोष्टी विसरून जातात आणि केवळ नकारार्थी गोष्टी लक्षात ठेवतात. त्याकरता कोणत्याही राजकीय पक्षाने सत्ताधारी झाल्यावर राज्यनैतिक पद्धतीने सरकार चालवावे.
देशातील राज्यघटनेचा व जनतेचा मान सन्मान राखावा. मग इतिहास त्या राजकीय पक्षाला कायम लक्षात ठेवतो किंवा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यांना वैयक्तिकरित्या लक्षात ठेवतो. म्हणून आपण अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना कायम लक्षात ठेवले आहे. म्हणून जगातल्या कोणत्याही सत्ताधारी पक्षाने निरंकुश होऊन राजकीय व्यवस्था चालवू नये.
जगाच्या इतिहासात रशिया, फ्रेंच, चीन या देशांमध्ये सुरुवातीला निरंकुश हुकूमशाही राजवट होती. त्या हुकूमशाहीला कंटाळून लोकांनी उद्रेक घडून आणला, त्यातून मग त्या देशात साम्यवाद, समाजवाद, लोकशाही सरकार स्थापन झाले. या तीन गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी त्या त्या देशांमध्ये लोकक्रांती झाली. हा जगातला न विसरता येणारा इतिहास आहे. भारतात देखील ब्रिटिशांनी आपली निरंकुश सत्ता प्रस्थापित केली होती. त्या सत्ते विरोधात अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य युद्ध झाले. ते ब्रिटिशांनी मोडून काढले. त्यानंतर मात्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीय जनतेत असंतोष पसरवला. टिळकांनी त्यावेळी ब्रिटिशांना
हलवून ठेवले होते त्यानंतर सावरकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, गांधी, नेहरू इत्यादी सर्व क्रांतिकारी नेत्यांनी, आपापल्या पद्धतीने संघर्ष करत या भारताला स्वातंत्र्य दिले. हा इतिहास आपल्याला व जगाला पूर्णपणे ठाऊक आहे तरीसुद्धा जगातल्या काही देशात अजूनही निरंकुश राज्यव्यवस्था चालवली जाते. मग जनता उद्रेकाने पेटून उठते, त्या संघर्षातून राजकीय सत्तेत परिवर्तन घडून येते. विरोधी राजकीय पक्षाचे सरकार देशात येते.
म्हणून आज दिल्लीत उच्चशिक्षण व्यवस्थेतील घोटाळ्याने २१ विद्यार्थी युवांनी आत्महत्या केल्या. या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधात शांततामय आंदोलन सुरू केले. दिल्ली पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी विद्यार्थ्यांना मारहाण केली.
केंद्र सरकारला काही दिवस गेल्यावर जाग आली.
काही केल्या आंदोलन थांबत नाही म्हणून त्यांनी या आंदोलनात लक्ष घातले. त्यात विरोधी पक्षांनी संसदेत गदारोळ केला म्हणून सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागले.
जनतेशी अशाप्रकारे सरकारने दडपशाहीचे धोरण ठेवले तर भारतातली लोकशाही टिकेल का? याची भिती निर्माण झाली आहे. देशात आज भाजपा सरकार आहे. उद्या कदाचित काँग्रेसचे सरकार किंवा अन्य कुठल्याही पक्षाचे सरकार येईल. त्यावेळी त्यांनी अशाचप्रकारे सरकारी दडपशाही जनतेवर लाधली तर आपल्या देशात लोकशाही राहील का? याची चिंता सामान्य माणसाला आज सतावत आहे. म्हणून मोदी सरकारने पुढाकार घेऊन सर्वपक्षीय राज्यनैतिक विधेयक आणावे. त्यात लोकशाही मजबूत करण्याकरता कायदा निर्माण करावा. म्हणजे पुढील काळात कोणतेही सरकार जनतेच्या लोकशाही हक्काची पायमल्ली करणार नाही. मोदी सरकार आजही काही प्रमाणात संवेदनशील आहे. त्या संवेदनशील विचारने राज्यनैतिक विधेयक या सरकारने संसदेत आणावे. असे झाले तर भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होईल.
✒️ॲड. रुपेश पवार, ठाणे
9930852165
