You are currently viewing ‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ कुडाळात भाजपची मानवी साखळी; विद्यार्थ्यांना न्याय, देशविघातक राजकारणाला विरोध

‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ कुडाळात भाजपची मानवी साखळी; विद्यार्थ्यांना न्याय, देशविघातक राजकारणाला विरोध

‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ कुडाळात भाजपची मानवी साखळी; विद्यार्थ्यांना न्याय, देशविघातक राजकारणाला विरोध

पेपरफुटीची सखोल चौकशी करण्याची मागणी; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर प्रभाकर सावंत यांचा विश्वास

कुडाळ :

‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना आणि जंतरमंतरवरील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी कुडाळ येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत देशाच्या अखंडतेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली.
आंदोलनादरम्यान बोलताना प्रभाकर सावंत म्हणाले की, परीक्षा पेपरफुटी किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न हे कोणत्याही राजकीय पक्षापुरते मर्यादित नसून देशाच्या भवितव्याशी निगडित आहेत. विद्यार्थ्यांना सनदशीर मार्गाने न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांना न्याय मिळावा यासाठी शासन यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, या संवेदनशील विषयाचा काही जण राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत काही विरोधक देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशाची स्थिती बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही आणि अशा प्रवृत्तींना भाजपकडून ठामपणे उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सावंत यांनी कोरोनासारख्या जागतिक संकटात तसेच आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळातही देशाचे नेतृत्व सक्षमपणे केल्याचा उल्लेख केला. विकसित भारताच्या दिशेने युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना देशातील जनता सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. देशाची अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृत्यांविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, संजय वेंगुर्लेकर, सीताराम तेली, बंड्या सावंत, निलेश परब, पप्या तवटे यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा