सिंधुदुर्ग :
धारगळ येथील टोलनाक्याची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
हे प्रकरण डिसेंबर २०२३ मधील असून, धारगळ टोलनाक्यावर प्रवेश शुल्कावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी टोलनाक्याची तोडफोड करून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
या कारवाईदरम्यान नितेश राणे यांच्यासह राहुल परब, मुकुंद परब, हरीशचंद्र सावंत, राकेश परब, प्रशांत मालकर, विनय आचरेकर, सागर पाटील आणि संतोष राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पेडणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या सर्व पुराव्यांचा विचार करून नितेश राणे आणि त्यांच्या सर्व सहआरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता तेजस पवार यांनी बाजू मांडली. तर आरोपींच्या वतीने ॲड. संग्राम देसाई आणि ॲड. अभय चिखलीकर यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी न्यायालयाचे आभार मानले.
