गणेशोत्सवात भेसळीला आळा; FDA ची जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम
कुडाळ :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) सिंधुदुर्ग विभागाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून, जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मोदक, पेढे, खवा, दूध, तेल-तुपासह बेकरी व फरसाण आस्थापनांवर लक्ष
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या मोदक, पेढे, खवा, खव्याचे पदार्थ, दूध, तेल, तूप, मैदा यांची विशेष तपासणी केली जात आहे. तसेच स्थानिक बेकरी व फरसाण विक्रेत्यांच्या आस्थापनांचीही स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने पाहणी करण्यात येत आहे.
कुडाळ, सावंतवाडी, कणकवली व वैभववाडीसह जिल्ह्यातील विविध भागांत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. या मोहिमेदरम्यान विविध अन्न आस्थापनांची पाहणी करून मोदक, पेढे, तेल, मैदा, तूप, डाळी, बेसन, रवा व दूध आदींचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
येत्या काळात तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता राखून अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
