महामार्गावरील खड्डे तात्पुरते बुजवले, कायमस्वरूपी काँक्रीट पॅचवर्कची मागणी
जड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता; आठ दिवसांत ठोस उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी :
शिवसेना नेत्या बबली राणे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित यंत्रणेने आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम केले. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हा उपाय तात्पुरता असल्याने कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट पॅचवर्क करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ओवळीये–हिवाळे मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात खडी, वाळू वाहून नेणारे डंपर तसेच महामार्गावरील कंटेनरसह इतर अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे केवळ डांबर टाकून खड्डे बुजविल्यास ते पुन्हा आठ ते पंधरा दिवसांत उखडून खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.
यामुळे संबंधित विभागाने तात्पुरत्या दुरुस्तीवर समाधान न मानता सिमेंट काँक्रीटचा मजबूत पॅच मारून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी बबली राणे यांनी केली आहे. अन्यथा नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
