You are currently viewing वामनराव महाडिक विद्यालयात लोकसहभागातून नूतनीकृत वर्गखोल्यांचे उद्घाटन

वामनराव महाडिक विद्यालयात लोकसहभागातून नूतनीकृत वर्गखोल्यांचे उद्घाटन

‘भरपूर परिश्रम करा, भरपूर अभ्यास करा; यश तुमच्या पावलांशी येईल!’ – प्रसाद तळेकर यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

कणकवली / तळेरे : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे येथे लोकसहभागातून नूतनीकरण करण्यात आलेल्या वर्गखोल्यांच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागातील संशोधन अधिकारी प्रसाद तळेकर हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्रसाद तळेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना, “भरपूर परिश्रम घ्या, भरपूर अभ्यास करा; शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. शिक्षण हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे,” असा संदेश दिला. त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी तळेरे गावचे दानशूर व्यक्तिमत्त्व व प्रतिष्ठित उद्योगपती मा. सुकांत वरुणकर व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यालयाच्या विकासासाठी विविध दानशूर व्यक्ती, मित्रमंडळे आणि माजी विद्यार्थ्यांनी उदारहस्ते आर्थिक सहकार्य केले. प्रसाद तळेकर यांनी ₹१ लाख ५१ हजार, सुकांत वरुणकर यांनी ₹२ लाख, स्व. विनय पावसकर मित्र परिवार यांनी ₹१ लाख ५१ हजार, बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने ₹१ लाख ११ हजार, दिलीपभाई तळेकर मित्र मंडळ यांनी ₹१ लाख ५१ हजार तसेच एस.एस.सी. बॅच २००२-०३ यांनी ₹१ लाख ५१ हजारांची देणगी देऊन वर्गखोल्यांच्या नूतनीकरणासाठी मोलाचे योगदान दिले.

याच कार्यक्रमात एस.एस.सी. बॅच १९८४-८५ यांच्या वतीने विद्यालयाला ₹१ लाख ५१ हजारांची देणगी सुपूर्द करण्यात आली. या बॅचचे प्रतिनिधित्व सेवानिवृत्त शिक्षक मंगेश मुद्रस व शुभांगी मनोज महाडिक यांनी केले. तसेच एम्पायर ग्रुप, कणकवली यांचाही विद्यालयाच्या विकासासाठी मोलाचा सहभाग लाभला.

कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थिनी गौरंगी शैलेंद्र परब हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्ह्यात चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा प्रशालेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

तळेरे ग्रामस्थ संतोष कल्याणकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना लाडू वाटप केले तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. राजू वळंजु यांनी विद्यालयाला सुमारे ₹२५ हजार किमतीची दोन कपाटे भेट देऊन शाळेच्या विकासात मोलाची भर घातली.

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर व देणगीदारांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रकाश वायंगणकर, माजी विस्तार अधिकारी पाताडे सर, दिलीपभाई तळेकर, उद्योजक राजू जठार, गोपाळकृष्ण प्रभू तसेच गणेश सुतार यांनी मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना परिश्रम, शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले. विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थी, हितचिंतक, ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी केले.

या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, देणगीदार, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा