*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक संपन्न*
सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (१७ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन क्षमता अधिक व्यापक पातळीवर विकसित करण्यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग हा नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, समुद्रकिनारे, किल्ले, ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक संस्कृती यांचा समृद्ध संगम असलेला जिल्हा आहे. ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याची पर्यटन ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून या उपक्रमाचा आराखडा बनविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आपल्या जिल्ह्यातील पर्यटन वाढणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई, कोकण विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रभा मनोहर, कार्यकारी अभियंता आकाश चकोर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पर्यटनस्थळांची निवड, आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पर्यटन माहिती केंद्रे, डिजिटल प्रचार, स्थानिक कला, खाद्यसंस्कृती आणि लोकसहभाग या विषयांवर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी विविध विभागांकडून आवश्यक माहिती संकलित करून कृती आराखडा तयार करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
श्री जोशी यांनी One State One Destinationg या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रारंभिक नियोजनानंतर संबंधित विभागांकडून सविस्तर प्रस्ताव प्राप्त करून पुढील टप्प्यात व्यापक कृती आराखडा निश्चित करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले. ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमामुळे सिंधुदुर्गची पर्यटन ओळख अधिक बळकट होऊन स्थानिक रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अमित कामत यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर सादरीकरण करुन आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.
या प्राथमिक बैठकीत सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना, पर्यटन सर्किटची निर्मिती, स्थानिक पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग आणि पर्यटकांचा दर्जेदार अनुभव वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध संस्था आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाबाबत मत मांडली.
