पुणे : संवेदनशील समाजाची निर्मिती करण्यासाठी समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि त्यांच्या कार्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. महाकवी कालिदास प्रतिष्ठान गेली.
दोन दशकांहून अधिक काळ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून ही सामाजिक जबाबदारी सातत्याने पार पाडत आहे. एका अर्थाने हे आधुनिक काळातील सामाजिक परिवर्तनाचे कार्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.
यावेळी सातारा येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व लेखक डॉ. मोहन सुखटणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे प्र-कुलगुरू डॉ. जोगिंदरसिंग बिसेन, संदर्भतज्ज्ञ, ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे, अभिनेत्री, निवेदिका स्वाती पाटणकर तसेच राजकवी स्व. भा. रा. तांबे यांचे नातू साहित्यिक शिरीष तांबे यांना साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘महाकवी कालिदास लक्षणीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
समारंभाला ज्येष्ठ सत्कवी प्रा. सु. द. वैद्य, महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भावकवी वि. ग. सातपुते, कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण, प्रा.डॉ. महेंद्र ठाकूरदास, ऍड.संध्या गोळे, मकरंद घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. वैद्य म्हणाले, ‘कालिदासांच्या साहित्याप्रमाणेच संतसाहित्यानेही अनेक शतकांपासून रंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.”
यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. तसेच काकासाहेब चव्हाण, वि. ग. सातपुते आणि डॉ. महेंद्र ठाकूरदास यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बहुभाषिक कवी संमेलनात ‘साहित्य साधना पुरस्कार’ प्रदान करण्यात आले तसेच वि. ग. सातपुते, महालिंग मेणकुदळे ऍड संध्या गोळे आणि प्रा. अशोक बाबर यांच्या एकूण आठ पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात मराठी हिंदी बहुभाषीक संमेलन पार पडले.
त्यामध्ये 60 कविंनी आपल्या रचना सादर केल्या. कविवर्य सुरेश शेठ यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
