You are currently viewing वेंगुर्ले लाईटहाऊसजवळ मासेमारी करताना युवक समुद्रात बुडाला; उशिरापर्यंत शोध निष्फळ

वेंगुर्ले लाईटहाऊसजवळ मासेमारी करताना युवक समुद्रात बुडाला; उशिरापर्यंत शोध निष्फळ

वेंगुर्ले लाईटहाऊसजवळ मासेमारी करताना युवक समुद्रात बुडाला; उशिरापर्यंत शोध निष्फळ

अणसूर येथील युवकाला मोठ्या लाटेने समुद्रात खेचले; आठ दिवसांतील दुसरी दुर्घटना

वेंगुर्ले

वेंगुर्ले शहरातील निमुसगा भागातील लाईटहाऊसजवळ गुरुवारी (दि. १६ जुलै) सायंकाळी खडकावर बसून ‘गरी’ने मासेमारी करत असताना अणसूर (देऊळवाडा) येथील एका युवकाला समुद्राच्या प्रचंड लाटेने पाण्यात खेचल्याची दुर्दैवी घटना घडली. स्थानिक आणि पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे वेंगुर्ले पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अणसूर येथील हा युवक मित्रांसह वेंगुर्ले येथे ‘गरी’ने मासेमारी करण्यासाठी आला होता. लाईटहाऊस परिसरातील किनाऱ्यावरील खडकावर बसून मासेमारी करत असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेने त्याला समुद्रात फेकले. काही क्षणांतच तो पाण्यात दिसेनासा झाला.
घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत युवकाचा शोध लागला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मोचेमाड समुद्रकिनारी ‘गरी’ने मासेमारी करताना एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांत समुद्रात बुडण्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात समुद्रकिनारी आणि खडकांवर मासेमारी करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा