पुण्यातील कवयित्री सायली गिरीश कुलकर्णी यांच्या कवितासंग्रहास स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर
पुणे
आसू येथील श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि स्वदेशी भारत बचतगट, सकुंडेमळा यांच्या वतीने हुतात्मा राष्ट्रबंधु राजीवभाई दिक्षित यांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त ३० नोव्हेंबर रोजी स्वदेशी भारत राज्यस्तरीय एकदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी विविध साहित्यविषयक स्पर्धांचे आयोजन केले जाते.यामध्ये राष्ट्रभक्तिपर काव्यलेखन, ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावरील निबंध लेखन, प्रकाशित पुस्तक व दिवाळी अंक अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धांचा निकाल नुकताच प्रकाश सकुंडे आणि वसंत सकुंडे यांनी जाहीर केला. प्रत्येक विभागातील विजेत्या स्पर्धकाला ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरवण्यात येणार आहे. आसू, तालुका फलटण येथील श्री. काळेश्वर मंदिरात ३० नोव्हेंबर रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे. आयोजित केलेल्या स्पर्धांमधील प्रकाशित पुस्तक कवितासंग्रह विभागात सायली गिरीश कुलकर्णी यांच्या ‘किमया घडली शब्दांची’ या कवितासंग्रहास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले असून ३० नोव्हेंबर रोजी सायली कुलकर्णी यांना ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे.
