You are currently viewing “जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेकडे वळावे” ; सत्यवान रेडकर यांचे आवाहन

“जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेकडे वळावे” ; सत्यवान रेडकर यांचे आवाहन

“जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेकडे वळावे” ; सत्यवान रेडकर यांचे आवाहन

दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये ६५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘तिमिरातून तेजाकडे’ अभियानांतर्गत ४०७ वा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

दोडामार्ग

“मी स्वतः कोणत्याही अकॅडमीत प्रशिक्षण न घेता जवळपास १५ लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो. मनात एकच जिद्द होती—माझ्या आयुष्याचं मला सोनं करायचं आहे. आज मी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे. मात्र, आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी प्रशासकीय सेवांकडे का वळत नाहीत, याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्यात इतर भागांतील अधिकारी येतात, पण आपल्या जिल्ह्यातील मुले त्या पदांवर का दिसत नाहीत?” असा प्रेरणादायी प्रश्न उपस्थित करत वरिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत करिअर घडविण्याचे आवाहन केले.
दोडामार्ग इंग्लिश स्कूल येथे तळकोकण विकास मंच आणि आनंदाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेडकर बोलत होते.
‘तिमिरातून तेजाकडे’ या ब्रीदवाक्याखाली महाराष्ट्रभर प्रशासकीय सेवांविषयी जनजागृती सुरू असून हा ४०७ वा मार्गदर्शन कार्यक्रम असल्याचे सांगत रेडकर म्हणाले, “सिंधुदुर्ग हा माझा जिल्हा असल्याने येथील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यशस्वी होताना पाहणे हे माझे स्वप्न आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर समाधान न मानता आतापासूनच ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करावी. त्यांच्या तयारीसाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करण्यास मी सदैव तयार आहे.”
यावेळी डॉ. महादेव गवस यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, “शिक्षण हेच स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे. उच्चशिक्षित होऊन समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा,” असा संदेश दिला.
कार्यक्रमात तालुक्यातील दहावी व बारावीतील ६५ हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा वह्या आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ३०० हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी तळकोकण विकास मंचचे अध्यक्ष प्रमोद गवस, आनंदाश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अविनाश नाईक, तुळशीदास सावंत, दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय पाटील, पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नदीप गवस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अविनाश नाईक यांनी केले, तर आभार तुळशीदास सावंत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा