You are currently viewing आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात भव्य मोफत आरोग्य शिबिर

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात भव्य मोफत आरोग्य शिबिर

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात भव्य मोफत आरोग्य शिबिर

१८ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात आयोजन; विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत, काही अल्प दरात

वेंगुर्ले

शिवसेना नेते, माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, १८ जुलै रोजी वेंगुर्ले येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे हे शिबिर होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले.

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिबिराची माहिती दिली. हे शिबिर वेंगुर्ले तालुका शिवसेना, सचिन वालावलकर मित्रमंडळ, भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर हॉस्पिटल आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. बी. चौगुले, डेरवण हॉस्पिटलचे डॉ. सचिन धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यासह अनेक पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत तसेच काही शस्त्रक्रिया अत्यंत अल्प दरात करण्यात येणार आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, मुतखडा आणि मोतीबिंदू यांसारख्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
तर हर्निया, महिलांचे गर्भाशयाचे आजार, थायरॉईड, मणक्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, मुळव्याध आणि स्तनांमधील गाठी यांवरील उपचार अल्प दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
शिबिरात जनरल सर्जन, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग आणि नेत्ररोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय सेवा मिळणार आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा