*बाजीगर गझलमंच तथा जागतिक साकव्य विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित पुस्तक परीक्षण*
*गझल बाजीगर*
(प्रातिनिधिक गझल संग्रह)
४ जुलै २०२५ रोजी, श्रेष्ठ गझलकार आ. सिराज करीम शिकलगार ह्यांनी नवोदितांना गझल शिकवण्यासाठी बाजीगर गझल मंच या समुहाची स्थापना व्हॉट्सअँप वर केली.
या समुहाचा उद्देश मराठी गझलेच्या सर्वांगीण प्रचार व प्रसारासाठीच असल्याने समुहात वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत. आज समुहात जवळ जवळ २१९ सदस्य असून त्यांच्या करता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसे की साप्ताहिक गझल इस्लाह दर शनिवारी, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मासिक गझल स्पर्धा आणि महिन्यातून एकदा ऑन लाईन गझल मुशायरा तसेच ऑन लाईन गझल कार्यशाळा असे नियमित उपक्रम घेतले जातात. गझल कार्यशाळेत प्रख्यात गझलकार /गझलकारांची गझलेसंबधी व्याख्याने आयोजित केली जात आहेत. त्याच प्रमाणे खुद्द सिराज सरांचे सुद्धा योग्य आणि सखोल मार्गदर्शन असतेच.
समुहात एका वर्षात गझलेस आत्मसात करणाऱ्या गझलकार व गझलकारांच्या आग्रहानेच *गझल बाजीगर* हा प्रातिनिधिक गझल संग्रह समुहाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, म्हणजे ५/७/२६ ला, पुण्यात झालेल्या संमेलनात प्रकाशित करण्यात आला ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे.
आ. सिराज सरांनी १५ /३ /२५ रोजी *बाजीगर प्रकाशन* सुरू केले. *गझल बाजीगर* प्रातिनिधिक गझल संग्रह हा ह्याच प्रकाशना मार्फत प्रकाशित करण्यात आला आहे.
समुहात काही तज्ञ तर बहुतेक नवोदित सदस्य आहेत. या गझलकारांच्या प्रत्येकी दोन गझला अशाप्रमाणे एकूण ७५ गझलकार/गझलकारांच्या १५० गझलांचा हा संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. संग्रह १५९ पानांचा असून त्यात अक्षरगण वृत्तातल्या १०७ गझला आणि मात्रा वृत्तातल्या ४३ गझला आहेत.
संग्रहाचे संपादक आ. सिराज सर असल्याने त्यांनी संपादकीय मनोगतात स्वतःच्या, १९९० ते २०२५ च्या जवळ जवळ ३५ वर्षाच्या कालावधीचा, कविता ते गझले पर्यंतच्या साहित्य प्रवासाचे वर्णन केले आहे. या कालावधीत त्यांनी एकूण ४९ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये फक्त गझलेचीच ३५ पुस्तके व एक दिवाण आहे व कविता, लेख इत्यादींची १४ पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच त्यांनी बाजीगर प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची नोंद संग्रहाच्या शेवटच्या पानावर दिली आहे.
‘गझल बाजीगर’ या संग्रहाच्या संपादकीय कामात सहाय्यक संपादक म्हणून गझलकार अरूण सावंत, गझलकार आप्पासाहेब कसबेकर, गझलकार अश्रफ मुकरी आणि गझलकारा सौ. अर्चना देवधर ह्यांनी मदत केली आहे.
या संग्रहास आद्य मराठी गझल संशोधक गझलकार प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर तसेच समीक्षक व ज्येष्ठ गझलकार बदीउज्जामा बिराजदार (साबिर सोलापूरी) ह्यांनी अभिप्राय व शुभेच्छा दिल्या आहेत.
नवोदितांबरोबर प्रस्थापित गझलकार/गझलकारांच्या गझला संग्रहात समाविष्ट आहेत. प्रामुख्याने सिराज शिकलगार, अरूण सावंत, आप्पासाहेब कसबेकर, अशरफ मुकरी, बदीउज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी), यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे, भागवत बनसोडे, उर्मिला बांदिवडेकर (माई) आणि शरयू शहा इत्यादीच्या गझला आहेत.
संग्रहातील गझला अतिशय छान व त्यांचे शेर मनाला भिडणारे आहेत. अथक परिश्रम घेऊन संपादक आणि सहाय्यक संपादकांनी गझला निर्दोष देण्याचा प्रयत्न केला आहे.
आता संग्रहातल्या काही गझलांचे आपण शेर पाहूया :-
समोरचा कसाही वागत असला तरी रागावर नियंत्रण ठेऊन स्वतःचा गुणधर्म सोडायचा नाही हे स्पष्ट करणारा गझलकार अशरफ हसन मुकरी सरांचा मक्त्याचा शेर पहा:-
*कडुलिंब आहे भोवती फोफावले*
*असरफ’ तुझ्या शब्दांत साखर जप जरा*
सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येतच असते. सुखाने बेफाम होऊ नये, तसेच दु:खाचा ही बाऊ करू नये. सुखानंतर दु:ख व दु:खानंतर सुख गृहीत धरावे हे सांगणाऱ्या गझलकारा मेहमूदा शेख ‘गुलपरी’ ह्यांचा व्योमगंगा वृत्तातला शेर बघा :-
*खूप केले सोहळे मी दु:ख आले ओसरीला*
*वाटला हेवा सुखाने लावली बघ रांग आता*
आजच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारा अनलज्वाला मात्रा वृत्ततला गझलकार आत्माराम कदम सरांचा शेर पहा :-
*किती चांगला होता सांगत बसती सारे*
*स्मशानातल्या सभा शेवटी भरल्या नंतर*
प्रत्येक आई वडील मुलांचे कोडकौतुक करतात व चांगलेच इच्छितात. कितीही हालाखीची परिस्थिती असली तरी त्याची झळ मुलांना लागू देत नाहीत. आजचे तरुण जे आईवडिलांस दूर करतात त्यांचे डोळे उघडणारा आनंदकंद अक्षरगण वृत्तातला आ. यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे सरांचा शेर पहा :-
*साऱ्या घरात आई दारात बाप होता*
*चटके परिस्थितीचे नाहीच सोसले मी*
मराठवाडयातील बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बी.ए.च्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात स्वीकृत झालेल्या आ. सिराज सरांच्या व्योमगंगा वृत्ततल्या गझलेचा मतला बघा :-
*हिकमतीच्या चार गोष्टी घालते डोक्यात माझ्या*
*माय माझी येत असते नेहमी स्वप्नात माझ्या*
आई आपल्या मुलांस सतत काही ना काही चांगले शिकवत असते. मुलांमध्ये ती चांगले संस्कार पेरत असते.
प्रत्येक आई आपल्या मुलांच्या पाठीशी असते. ती जगात नसली तरी काही संकेतांनी तिचे आपल्यावर लक्ष असल्याचे तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलांनाही नक्कीच जाणवत असते. असेच गझलकार आपल्या मतल्यात सांगू इच्छितात. हिकमतीच्या, विवेकाच्या चार गोष्टी आई स्वप्नात येऊन सांगत असते. आपल्या प्रेमळ आईला मुलं ही कधीच विसरत नाहीत. ‘आई तुझा आशीर्वाद’ असे रिक्षा, गाडी, लॉरीच्या मागे लिहिलेले पाहण्यात येते. उद्देश हाच की आईचे आशीर्वाद नेहमी मुलांच्या सोबत असतात.
ह्या संग्रहात मला खूप आवडलेले शेर मी खाली नमूद करते बघा आपणासही नक्कीच आवडतील:-
*गाभुळलेली चिंच वाटते तुझी आठवण*
*चाफा हिरवाकंच वाटते तुझी आठवण*
*—गझल गुरूवर्या माई*
*सरस्वती साधनेस पाहिजेच तळमळ ही*
*अति चंचल हृदयाला वळवण्यास मन झटते*
*- — डॉ.शरयू शहा*
*सत्तेस चाखण्याला जमतात पक्ष येथे*
*कोणीच मात्र नाही कर्तव्यदक्ष येथे*
*–अरूण सावंत*
*तो देव रंजल्यांचा कोठेच कां दिसेना*
*भोळ्याच भावनाही आतून ठार झाल्या*
*–लिला पुजारी डोहळे*.
*धूळ ठेवून ती चेहऱ्याला*
*दोष देऊ नये आरशाला*
*–केशव गजभिये*
*अंधार सारुनी मी गेले पुढेच आहे*
*घेऊन खूप आशा आली पहाट आहे*
*—सौ. मिनल महेश तवटे*
*जीवनी दाटला कुट्ट अंधार तर*
*मित्र तेजाळतो काजव्या सारखा*
*–बदीऊज्जमा बिराजदार(साबिर सोलापुरी)*
*गझलकार तो आहे म्हणायचे का आम्ही*
*निम हळकुंडे उतला माझी हरकत नाही*
*–आप्पा कसबेकर*
*मुलगा मुलगी समान आहे समाजामध्ये तत्व रुजावे*
*निष्पापी त्या कलिकेचे मग गर्भामधले मरण टळावे*
*–दीपलक्ष्मी वडापूरकर.*
*करतो चुका पुन्हा त्या व्हावी गुन्ह्यास शिक्षा*
*हातून वेळ जाता खचण्यात अर्थ नाही*
*—मीना महामूनी*
अजुनही मनाला भिडणारे खूप शेर आहेत. तुर्तास मी एवढेच लिहिते. गझला वाचून आनंद घेण्यास *गझल बाजीगर* अवश्य वाचा.
संग्रह:- गझल बाजीगर प्रातिनिधिक
संपादक:- सिराज करीम शिकलगार
प्रकाशक:- बाजीगर प्रकाशन
मुखपृष्ठ:- हेमंत आर्ट
किमंत :- ₹३००
परिक्षण:- शोभा वागळे….पुणे
8850466717
