You are currently viewing NCMC कार्डासाठी ज्येष्ठ, दिव्यांगांची उन्हात फरफट; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची तात्काळ धाव

NCMC कार्डासाठी ज्येष्ठ, दिव्यांगांची उन्हात फरफट; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची तात्काळ धाव

NCMC कार्डासाठी ज्येष्ठ, दिव्यांगांची उन्हात फरफट; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची तात्काळ धाव

रखरखत्या उन्हात रांगेत उभ्या नागरिकांसाठी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था; उद्यापासून शेड व बैठक व्यवस्था करण्याचे डेपो प्रशासनाचे आश्वासन

सावंतवाडी

सवलतीच्या दरात एसटी प्रवासाचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग बांधव तसेच पत्रकारांसाठी NCMC कार्ड दिले जात आहे. मात्र सावंतवाडी व बांदा या दोन्ही विभागांसाठी एकाच एजंटमार्फत आणि एकाच कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कार्ड वितरण सुरू असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत सावंतवाडी, बांदा व कुडाळ परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग बांधवांची मोठी गर्दी झाली होती. रखरखत्या उन्हात तासन्तास रांगेत उभे राहिल्याने अनेकांची गैरसोय झाली.
या प्रकाराची दखल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि शेखर सुभेदार यांनी घेतली. त्यांनी तात्काळ एजंट तसेच डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याकरिता स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली. तसेच तहानलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
यामुळे उन्हात उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला. भविष्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ती सहन करणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासनाला दिला.
यानंतर डेपो प्रशासनाने उद्यापासून संबंधित ठिकाणी पत्र्याची शेड उभारून ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या तत्पर हस्तक्षेपामुळे दिलासा मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग बांधवांनी रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि शेखर सुभेदार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा