*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तृषार्त धरतीच्या उदरी!*
तप्ततृषार्त धरतीच्या उदरी
मेघकुंभ जलओथंबुनी रिते
होत मनापासून ओसंडले
तरारत्या बीजे कूस उजवते…..
घट्ट ढेकाळली धरा मऊशार
चोहोबाजूने भिजून काळीशार
भुसभशीत होई घेता जलधार
नव्या अंकुरासाठी होई अलवार
नीट मशागतीने बीज धरे जीव
बळीराजाच्या जोपासनेने फुलती
हिरवेगार सुंदर शहारते कोंब
आसुसल्या भुईत अंकुर तरारती
किती दिस वाट पाहुनि थकली
परी येता पावसाची धार मनोमन
आनंदाने चिंब होऊनि सुखावली
सार्या शिवाराचे झाले हिरवे रान
आता लाडक्या बाळांस गोंजारुनि
सांभाळे आपल्या उबेत कवटाळुनि
शेतकरी राजा पुरवित खतपाणी
सांभाळितो वसुंधरेस काळजीनी
दिन झाले पुरे,पीके आली तरारुनि
आनंदला बळीराजा,कष्टाचे मोल
हृदय भरुनी,हिरवे शिवार पाहुनी
देवाच्या कृपेने,दान मिळेअनमोल….
स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर
कलाशिक्षिका.
