You are currently viewing मुणगे ॲट्रॉसिटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा

मुणगे ॲट्रॉसिटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा

मुणगे ॲट्रॉसिटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; कायद्याच्या गैरवापराचा आरोप

चर्मकार समाज उन्नती मंडळ, बुद्धिस्ट फेडरेशन व ग्रामस्थांची संयुक्त पत्रकार परिषद; निनावी अणुऊर्जा समर्थक बॅनरमागील सूत्रधार शोधण्याची मागणी

कणकवली :

देवगड तालुक्यातील मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवरून झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग आणि मुणगे ग्रामस्थांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. कोणावरही अन्यायाचे समर्थन नसले तरी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर समाजात जातीय तेढ निर्माण करू शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष संदीप कदम आणि सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी मुणगेचे प्रशासकीय उपसरपंच दशरथ मुणगेकर, खुडीचे सरपंच दीपक कदम, नगरसेवक लुकेश कांबळे, प्रकाश मुणगेकर, मनोहर मुणगेकर, देविदास मुणगेकर, बौद्धाचार्य ल. का. कदम, चंद्रकांत मुणगेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुजित जाधव यांनी सांगितले की, मारहाण झाली असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, पुरेशा आधाराशिवाय ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संस्थेचे नाव परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा दावा करत, भविष्यात असे प्रकार झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

संदीप कदम यांनी सांगितले की, अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ निनावी बॅनर रात्री लावण्याचा प्रयत्न झाला. त्याला ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर किरकोळ धक्काबुक्की झाली. मात्र, शेकडो लोकांनी मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ झाली किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला, हे दावे वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासकीय उपसरपंच दशरथ मुणगेकर यांनी सांगितले की, ग्रामसभेने अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधाचा ठराव मंजूर केला असून गावात सामाजिक सलोखा कायम आहे. जातीच्या आधारावर भेदभाव किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होईल, अशी परिस्थिती कधीच नव्हती. त्यामुळे संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत उपस्थितांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या निनावी बॅनरमागील सूत्रधारांचा शोध घेऊन संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचाही आरोप करण्यात आला.
यावेळी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये ते नेहमीच पीडितांच्या पाठीशी राहतील, मात्र ॲट्रॉसिटी कायद्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच मुणगे ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा देत अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या भावना शासनाने लक्षात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा