You are currently viewing सामाजिक नीतिमत्ता आणि आपण

सामाजिक नीतिमत्ता आणि आपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सामाजिक नीतिमत्ता आणि आपण*

 

अल्पवयीन असताना नीतिमत्ता हा शब्द माहीत असला तरी त्याचा नेमका अर्थ काय हे कळत नव्हते. आपल्या आजूबाजूला खोटे बोलणारी, खोटी कामे करणारी माणसे मी पाहत होते, परंतु त्याचे नीतिमत्तेशी काही नाते असू शकते हे समजण्याइतकी परिपक्वता आली नव्हती.

 

सिनेमा पहावयास गेले की बऱ्याचदा हाऊसफुलची पाटी पाहून हिरमुसल्या मनाने कित्येकदा घरी परत आल्याचे स्मरते आहे.सिनेमागृहाच्या आवारात बरीच मुले ” दो का दस, दो का दस” असे कानाशी येऊन बोलायचे. मी वडिलांना सांगायचे, ” पपा या माणसांकडे तिकिटे आहेत, आपण घेऊ या का यांच्याकडून? ” पप्पा म्हणायचे, ” मुळीच नाही. हा काळा बाजार आहे, आपण याला कधीच प्रोत्साहन द्यायचे नाही. ” लहान वयात हे असेच संस्कार घडत गेले आणि त्यामुळे एकेक अनुभव घेत घेत नीतिमत्ता या शब्दाचा अर्थ कळत गेला.* नीतिमत्ता म्हणजे माणसाचे सद्‍वर्तन! समाजात वावरावयाचे ठराविक निकष* असा अर्थ मला समजला.

 

सनातन धर्म आपल्याला काय शिकवण देतो?

*सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्*

*न ब्रूयात् सत्यमप्रियम्*

*प्रियं च नानृत्ं ब्रूयात्*

*एष धर्मः सनातनः*

 

अर्थात, सदा सत्य वदावे, बोलताना दुसऱ्याला प्रिय वाटेल असे बोलावे, एखादे सत्य कटू किंवा अप्रिय असेल तर त्याची वाच्यता टाळावी, ऐकण्यास मधुर परंतु पूर्णतया खोट्याने भरलेल्या स्थितीचे कधी वर्णन करू नये. हा सदाचार आहे, हाच धर्म आहे, हीच नीती आहे.

 

प्रश्न असा आहे की ही धर्ममूल्ये समाजात सर्वत्र पाळली जातात का? आपण तर हल्ली नेहमीच म्हणत असतो, ” नीतिमत्ता हरवली आहे. मनुष्य माणुसकी विसरला आहे. स्वार्थाने जग आंधळे झाले आहे. मला रहायला प्रशस्त घर हवे, फिरायला आरामदायी चार चाकी वाहन हवे, पंचपक्वानांचे भोजन हवे, ल्यावयास उंची वस्त्र हवे. मला शेजारचा, उपाशी, रस्त्यावरचा दीनवाणा माणूस दिसत नाही. फक्त मी, मी आणि मी.

 

आजचे समाजाचे अत्यंत विषम चित्र आपण पाहत आहोत. धनिक हा दिवसेंदिवस अधिक धनवान होत चालला आहे आणि या उलट गरीबाचा वाली कोणी उरलेला दिसत नाही. त्याला दोन वेळची पोटभर भाकरी मिळेल की नाही याची सतत फिकीर!

 

कोणतेही सामाजिक क्षेत्र घ्या. बँकेत गेले तरी एका फेरीत सर्व कामे कधीच होत नाहीत. सरकारी कचेरीत तीच तऱ्हा. ” अहो तुमची फाईल अद्याप साहेबांची सही होऊन आली नाही, असं करा दोन दिवसांनी या. ” दोन दिवसांनी त्या अडलेल्या माणसाचे काम होईलच याचा मुळीच भरवसा नाही. त्याला पुन्हा पुन्हा चकरा मारायला किती त्रास होत असेल याचा विचार करावासाच वाटत नाही, मग तो माणूस तरुण असो वा ज्येष्ठ. फाईल मध्ये काही वजन ठेवल्यास काम फत्ते!

 

आमची घराची केस कोर्टात उभी राहिली होती. आम्ही नियमित नियोजित तारखेस हजरही राहत होतो. प्रत्येक वेळी रजा घेऊन कोर्टात उपस्थित राहणे अतिशय अवघड जात होते तरीही कसे तरी जमवून कोर्टाच्या वाऱ्या चालूच होत्या. वकील आमच्या नात्यातलेच होते. त्यांनी सांगितले की प्रत्येक तारखेला आम्हाला उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. ते सर्व पाहून घेतील. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही निश्चिंत राहिलो आणि जेव्हा निकाल आमच्या विरुद्ध एकतर्फी जाहीर झाला तेव्हा समजले की आमचे वकील प्रतिवादी वकिलांना जाऊन मिळाले आणि कोर्टात तारखांना हजर झालेच नाहीत. केवळ पैशाच्या मोहाने सुशिक्षितांनी आपली नीतिमूल्यें सोडावीत यासारखे दुःख ते काय?

 

आज पैशापुढे जग आंधळे झाले आहे. नीतीमूल्यांना सुरुंग लावून माणूस सापडेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. असे करताना मुलगा ना बापाचा विचार करतो, ना भाऊ भावाला ओळखतो. आई-वडिलांना न विचारता खोट्या सह्या करून त्यांची आयुष्याची मिळकत हडप करणारी आणि त्यांना वृद्धाश्रमा!?”?ची वाट दाखवणारी कितीतरी मुलांची उदाहरणे डोळ्यां”समोर आहेत.

 

मुलांच्या या अशा वागण्यामुळे म्हणावे लागते, ” पुढ्यातले भरलेले ताट द्यावे पण बसायचा पाट आपल्या हयातीत कोणालाही देऊ नये. ” देवा घरी जाताना कोण काय सोबत नेतो हो? शेवटी आई-वडिलांचे जे आहे ते मुलांनाच तर मिळायचे असते, पण धीर हवा ना?

 

स्त्रीकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे ही समाजातील अत्यंत दुर्दैवी स्थिती आहे. फार मोठी विकृती आहे. नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीचे जीवन सुरक्षित आहे का? प्रवासात, प्रत्यक्ष कार्यालयात, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांचे जिणे अत्यंत असुरक्षित असल्याचे लक्षात येते. वर्तमानपत्रे, सोशल मीडिया यावरून बलात्काराच्या वार्ता वाचावयास पहावयास मिळतात? याला आळा कसा घालायचा? आजही आपली अब्रू चव्हाट्यावर यावयास नको म्हणून आवाज न उठवता मूग गिळून बसणाऱ्या गरीब गाई आहेतच की.

 

जगात सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतातील किती लोक हरवलेल्या नैतिकतेला पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतील? बघेच जास्त आणि कार्यकर्ते हाताच्या बोटावर मोजण्याइतके ही परिस्थिती आहे.

 

अशा परिस्थितीत कोणी कसे वागावे यावर भाष्य करण्यापेक्षा मला वाटते की नैतिकता जपण्याचे कार्य प्रत्येकाने स्वतःपासूनच

करावे. माझा फायदा नाही झाला तरी चालेल, मी खोट्याचा आधार कधीच घेणार नाही, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारास मी प्रोत्साहन देणार नाही. माझ्या कुवतीनुसार गरजूंना मी मदतीचा हात देईन. कौटुंबिक, सामाजिक जिव्हाळ्याचे संबंध अधिकाधिक दृढ कसे होतील याकडे लक्ष देईन. सार्वजनिक मालमत्तेची नासाडी होणार नाही याकडे माझे लक्ष असेल. अशा प्रकारच्या प्रतिज्ञा जर प्रत्येकाने केल्या तर नजीकच्या काळात नीती मूल्यांविषयी बरीच जागृतता येऊन समाजात नक्की सकारात्मक सुधारणा होण्यास विलंब लागणार नाही.

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

०८/०७/२०२६

प्रतिक्रिया व्यक्त करा