मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धेत वर्चस्व; १८ पारितोषिकांपैकी तब्बल ९ पारितोषिकांवर नाव
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने खुल्या गटात विजेतेपद पटकावत चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत निर्विवाद यश संपादन करत त्याने जिल्ह्यातील अव्वल स्थान कायम राखले. मुक्ताई ॲकेडमीच्या तब्बल २८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सहा वर्षांपासून पुढील वयोगटातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेतील एकूण १८ पारितोषिकांपैकी तब्बल ९ पारितोषिके मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी पटकावून उल्लेखनीय यश मिळविले.
ही स्पर्धा मुख्य गट, १६ वर्षांखालील गट आणि ११ वर्षांखालील गट अशा तीन विभागांमध्ये पार पडली. मुख्य गटात पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी तीन, तसेच १६ व ११ वर्षांखालील गटांमध्ये मुलगे व मुलींसाठी प्रत्येकी तीन अशा एकूण १८ क्रमांकांची बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू ठरलेल्या मुक्ताई ॲकेडमीच्या अवघ्या ६ वर्षीय दिव्यांका नार्वेकर हिने ११ वर्षांखालील मुलींच्या गटात पाच फेऱ्यांमध्ये तीन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून तीन गुणांसह तिसरे स्थान पटकावले. तसेच ७ वर्षीय आकाश वाटवे याने ११ वर्षांखालील मुलांच्या गटात सहा फेऱ्यांमध्ये चार प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत चार गुणांची कमाई केली.
मुक्ताई ॲकेडमीचे विजेते पुढीलप्रमाणे :
खुला गट :
• प्रथम – बाळकृष्ण पेडणेकर
१६ वर्षांखालील गट :
मुलगे :
• द्वितीय – हर्ष राऊळ
मुली :
• प्रथम – गार्गी सावंत
• द्वितीय – चारुल जाधव
• तृतीय – सलोनी चव्हाण
११ वर्षांखालील गट :
मुलगे :
• तृतीय – ८ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर
मुली :
• प्रथम – ९ वर्षीय मोहीशा जाधव
• तृतीय – ६ वर्षीय दिव्यांका नार्वेकर
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
