श्रीराम मंदिर दानपेटी लूटप्रकरणी काँग्रेसचा जिल्हाभर ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’
९ ते १४ जुलैदरम्यान सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात भजन, दिंडी, कथावाचनातून जनजागृती; दोडामार्गातून आंदोलनाची सुरुवात
मालवण
अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मंदिराच्या दानपेटीमध्ये लूट करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार हा जिल्हाव्यापी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
या सत्याग्रहाची सुरुवात गुरुवार, ९ जुलै रोजी दोडामार्ग शहरातून होणार असून १४ जुलैपर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आंदोलनाचे स्वरूप आध्यात्मिक व प्रबोधनात्मक ठेवण्यात आले असून, भजनांच्या गजरात दिंडी काढणे, श्रीराम चरित्र व नैतिक मूल्यांवर आधारित कथावाचन तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सांगता विश्वकल्याणासाठी पसायदानाने होणार आहे.
श्रीराम मंदिराच्या पवित्र दानराशीची लूट करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध नोंदवून त्यांना सद्बुद्धी मिळावी, या भावनेतून हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला असल्याचे श्री. मोंडकर यांनी सांगितले. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
