सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर नव्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यांना मंजुरी;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रसन्ना देसाईंकडून आभार
सावंतवाडी
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर जनसुविधेच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. या निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल भाजप सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून सावंतवाडी रोड स्थानकावर काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने पुढील गाड्यांना सावंतवाडी रोड येथे थांबा देण्यास मान्यता दिली आहे.
१२१३३/१२१३४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मंगळुरू एक्सप्रेस
१२४३१/१२४३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
१२२०१/१२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
प्रसन्ना देसाई यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकणातील जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच संवेदनशील राहिले आहेत. त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळेच सावंतवाडी रोड स्थानकाला ही महत्त्वाची सुविधा मिळाली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांनी विशेष आभार मानले.
या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.
