You are currently viewing सावंतवाडी रोड स्थानकाला आणखी तीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा; रेल्वेमंत्र्यांची मंजुरी

सावंतवाडी रोड स्थानकाला आणखी तीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा; रेल्वेमंत्र्यांची मंजुरी

सावंतवाडी रोड स्थानकाला आणखी तीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा; रेल्वेमंत्र्यांची मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश; मुंबई, दिल्ली, केरळ व कर्नाटकशी रेल्वे संपर्क अधिक बळकट

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा देण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंजूर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मंगळुरू एक्सप्रेस (१२१३३/१२१३४), तिरुवनंतपुरम सेंट्रल–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (१२४३१/१२४३२) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१/१२२०२) यांचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्राद्वारे या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे. यापूर्वी २५ मार्च २०२६ रोजी सावंतवाडी रोड स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत ही मान्यता देण्यात आली.

या नव्या थांब्यांमुळे सावंतवाडीचा मुंबई, दिल्ली, केरळ आणि कर्नाटकसह देशातील विविध भागांशी रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होण्याबरोबरच पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून, कोकणातील रेल्वे सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा