आंबोली घाटात मुख्य रस्त्यावर भलेमोठे दगड कोसळले; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
चार नंबर धबधब्याजवळील घटना; एकेरी वाहतूक सुरू, पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर
आंबोली :
आंबोली घाटातील दरडी कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर असलेल्या चार नंबर धबधब्यालगत मुख्य रस्त्यावर भलेमोठे दोन ते तीन दगड कोसळल्याची घटना घडली. या मार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ असतानाच ही घटना घडली. मात्र, दगड कोसळले त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
सध्या हे दगड रस्त्यावरच असल्यामुळे दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील दगड तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता, घटनास्थळी जेसीबी पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दगड हटविण्याचे काम सुरू असून लवकरच रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
