You are currently viewing आडाळी एमआयडीसीला मोठा दिलासा; भूखंड वाटपावरील स्थगिती उठविण्यासह आठ महत्त्वाचे निर्णय

आडाळी एमआयडीसीला मोठा दिलासा; भूखंड वाटपावरील स्थगिती उठविण्यासह आठ महत्त्वाचे निर्णय

आडाळी एमआयडीसीला मोठा दिलासा; भूखंड वाटपावरील स्थगिती उठविण्यासह आठ महत्त्वाचे निर्णय

आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द, भूखंड वाटप प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीतील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू होण्यास येणाऱ्या अडचणी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे विशेष बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीनुसार आयोजित या बैठकीत आडाळी एमआयडीसीला गती देण्यासाठी आठ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीत आडाळी एमआयडीसीमधील भूखंडधारकांना मोठा दिलासा देण्यात आला. भूखंडांचा ताबा, करार प्रक्रिया आणि बांधकाम परवानगीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नव्या इच्छुक उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची ऑनलाइन प्रक्रिया येत्या दोन आठवड्यांत सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.

याशिवाय, आडाळी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगांना चालना देण्यासाठी आणि नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात गोव्यात गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरले.

सिंधुदुर्गातील उद्योजकांना एमआयडीसीच्या कामासाठी रत्नागिरीला जावे लागत असल्याने होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आता दर गुरुवारी आडाळी येथे एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी उपलब्ध राहून उद्योजकांची कामे मार्गी लावतील, असा निर्णयही घेण्यात आला.

आडाळी एमआयडीसीसाठी आवश्यक असलेल्या इन्सुली–आडाळी ३३ केव्ही पर्यायी वीजवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून डेटा सेंटरसह अन्य उद्योग उभारण्याच्या शक्यतेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

याशिवाय, आडाळी एमआयडीसीतील इतर प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन), तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आडाळी एमआयडीसीतील समस्यांवर तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा