You are currently viewing तालुकास्तरीय १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

तालुकास्तरीय १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

तालुकास्तरीय १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा: आठ संघांच्या लढतीत ‘मदर क्वीन इंग्लिश स्कूल’ अजिंक्य! जियाद शेख ठरला उत्कृष्ट फलंदाज

सावंतवाडी:
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय १४ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘मदर क्वीन इंग्लिश स्कूल’च्या संघाने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तालुक्यातील एकूण आठ दिग्गज संघांमध्ये रंगलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत मदर क्वीन स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.
या संपूर्ण स्पर्धेत मदर क्वीन इंग्लिश स्कूलच्या जियाद शेख याने आपल्या बॅटिंगचा धडाका दाखवून दिला. संपूर्ण स्पर्धेत दोन धडाकेबाज अर्धशतके झळकावणाऱ्या जियादने अंतिम सामन्यातही ३ उत्तुंग षटकार ठोकून झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याला ‘स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज’ या किताबाने सन्मानित करण्यात आले.
तसेच, बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर छाप पाडणाऱ्या मदर क्वीन स्कूलच्या श्रेयस कांबळे याला ‘अष्टपैलू खेळाडू’ (All-Rounder) म्हणून गौरवण्यात आले.
आठ संघांच्या कडव्या आव्हानावर मात करत मिळवलेल्या या विजयामध्ये श्रेयस कांबळे याच्यासह यश बिरोडकर, यश जाधव आणि युवराज राऊळ यांनी मोलाची कामगिरी बजावली. सर्व खेळाडूंच्या या सांघिक आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मदर क्वीन स्कूलने तालुकास्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे, मार्गदर्शक प्रशिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आयुषचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा