You are currently viewing ‘मिशन आयएएस’चे प्रणेते: प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

‘मिशन आयएएस’चे प्रणेते: प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

 

शिक्षण हे समाजाच्या परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे, या ध्येयाने प्रेरित होऊन ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे. आज १ जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा आणि विशेषतः स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आढावा घेणे अत्यंत औचित्यपूर्ण ठरेल.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रा. डॉ. काठोळे यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवला आहे. केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, अचूक नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ या त्रिसूत्रीचा प्रत्यय वेळोवेळी येतो.

स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचे योगदान अतुलनीय आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील हुशार, पण मार्गदर्शनापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘मिशन आयएएस’ ही मोहीम यशस्वीपणे राबवली. या मोहिमेने रजत जयंतीच्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. या विशेष प्रसंगी, राज्याच्या महसूल विभागाचे अवर सचिव श्री.विकास खारगे साहेब यांनी प्रा. डॉ. काठोळे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले होते. मिशन आयएएसच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने आयोजित केले जाणारे ‘संस्कार शिबीर’ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना घडवि ण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करीत त्यांनी सरांचा विशेष सत्कार देखील केला होता.

आजच्या काळात आपण तुकाराम मुंडे यांच्यासारख्या ध्येयवेढ्या आणि कार्यतत्पर सनदी अधिकाऱ्यांचे कार्यकर्तृत्व पाहतो. हे अधिकारी व्यवस्थेत राहूनही ज्या प्रकारे प्रामाणिकपणे काम करतात, ते पाहून प्रेरणा मिळते. खरोखरच, जर अशा प्रकारचे शंभर अधिकारी आपल्या प्रशासनात तयार झाले, तर समाजातील समूळ भ्रष्टाचार आणि भेसळ यांसारख्या समस्या कायमच्या नष्ट होतील आणि एक सुदृढ समाज निर्माण होईल. मात्र, असे अधिकारी आपोआप घडत नाहीत, तर त्यांना घडवावे लागते. आज ही मोठी जबाबदारी प्रा. डॉ. काठोळे सरांसारख्या निष्ठावान शिक्षकांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर त्या बुद्धिमत्तेला चारित्र्याची जोड हवी असते, आणि हेच काम काठोळे सर आपल्या शिबिरांतून करीत आहेत. म्हणूनच, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे ‘संस्कार शिबीर’ आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनले आहे.

वाढदिवसानिमित्त बोलताना ते नेहमीच विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा संदेश देतात.”स्पर्धा परीक्षा देणें म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे माध्यम नसून, ते राष्ट्रसेवेचे एक व्रत आहे. यश मिळविण्यासाठी लागणारी जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाची तयारी ठेवा. संकटं येतील, पण ध्येयावरची नजर ढळू देऊ नका. तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना ओळखा आणि त्यांना योग्य दिशा द्या कारण आजचा विद्यार्थी हाच उद्याचा प्रगल्भ आणि चारित्र्यवान प्रशासक आहे.”

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा हा प्रवास शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या प्रेरणेतून तयार होणारे भावी प्रशासक देशाच्या नवनिर्माणात मोलाचे योगदान देतील आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात यशस्वी होतील, यात शंका नाही.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

=============

रवींद्र दांडगे

अमरावती.

प्रतिक्रिया व्यक्त करा