नागपूरला नवीन पोलीस आयुक्त म्हणून श्री विश्वास नांगरे पाटील हे आज रुजू झाले आहेत त्यानिमित्त
विश्वास नांगरे पाटील आणि मी
पुण्याच्या विभागीय आयुक्त श्रीमती शीतल उगले तेली यांची भेट घेऊन मी महाराष्ट्र एक्सप्रेसने अमरावतीला होत असलेल्या श्री तुकाराम मुंढे यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या सभेसाठी निघालो होतो. तेवढ्यात गुगलवर बातमी वाचली की सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. ही बातमी वाचताच आनंद झाला.
गेल्या अनेक वर्षापासून मी श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या संपर्कात आहे. आमच्या मुलांना त्यांच्याकडे घेऊन जाणे. त्यांच्या गावाला जाणे. त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणे .त्यांचे मुलांना ऑनलाईन मार्गदर्शन घडून आणणे. या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टींना श्री विश्वास नांगरे पाटील यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मी जेव्हा त्यांच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या त्यांच्या गावाला गेलो तेव्हा त्यांचे बंधू तसेच वडिलांनी माझे मनापासून स्वागत केले. माझी कार गावात शिरताच मी विश्वास नांगरे पाटलांच्या घराची चौकशी केली. एक उत्साही तरुण म्हणाला माझ्या मोटरसायकल मागे तुमची गाडी येऊ द्या. आम्ही साहेबांचे घर पाहिले. साहेबांच्या वडिलांशी भावांशी चर्चा केली. जेवण केले.श्री विश्वास नांगरे पाटलांनी ज्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास केला की अभ्यासिका पाहिली. ज्या आमदारांनी म्हणजे श्री शिवाजीराव देशमुख यांनी या अभ्यासिकेला उभारण्यासाठी मदत केली त्यांच्या घरी जाऊन आलो. तेव्हा ते हयात होते.
श्री विश्वास नांगरे पाटील जेव्हा कोल्हापूरला विशेष पोलीस महानिरीक्षक होते. तेव्हा
आम्ही आमची मिशन आय ए एस ची मुले घेऊन त्यांना भेटायला गेलो. या गोष्टीला किमान 14 वर्षे झाली असतील. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला मोबाईल वगैरे बाहेरच ठेवायला सांगितले. आम्ही आतमध्ये जाताच श्री विश्वास नांगरे पाटलांनी मनापासून स्वागत केले. मला म्हणाले तुमचे पोस्ट कार्ड मला नियमित येते .मी तुम्हाला पोस्टकार्ड मुळे जास्त ओळखतो. आम्ही मुलांबरोबर त्यांचे छायाचित्र काढण्याचे ठरविले .साहेबांनी लगेच त्यांच्या पीएला बोलाविले आणि आमचे छायाचित्र काढावयास सांगितले. आमच्या मिशन आय ए एस च्या उपक्रमाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. मुलांची चौकशी केली. काही मुलांना जवळ बोलाविले आणि त्यांची आस्थेने चौकशी केली. आम्ही त्यांना अमरावतीचे निमंत्रण दिले. ते म्हणाले आमच्या विभागाचे काम असे आहे की काही सांगता येत नाही. बघा आता. उद्या माझा मुंबईला मोठा कार्यक्रम आहे. सर्व तयारी झालेली आहे आणि आता पालकमंत्र्यांनी उद्या एका सभेचे आयोजन केले आहे. मला त्या कार्यक्रमाला जाता येणार नाही .आयोजकांची किती पंचायत होईल. त्यापेक्षा आपण ऑनलाइनच भेटू या.
आम्हाला आठवते आम्ही अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये दहा दिवसांच्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांचा कॅम्प आयोजित केलेला होता. या दहा दिवसीय स्पर्धा परीक्षा शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून 850 मुले आली होते. हा कार्यक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला पाहिजे इतका दर्जेदार होता व इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी दहा दिवस निवासी राहतात व प्रशिक्षण घेतात हा देखील एक विक्रमच होता. या शिबिराला आय ए एस टॉपर श्री अमृतेश औरंगाबादकर हे देखील आले होते.या कॅम्पला विश्वास नांगरे पाटील यांना बोलाविण्याचे ठरले तेव्हा ते ठाण्याला जिल्हा पोलीस अधीक्षक होते. ते म्हणाले आमच्या पोलिसांचे काही खरे नसते .त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन व्यवस्था करा. त्या काळात ऑनलाईन व्यवस्था करणे खूप कठीण काम होते. पण माझे सहकारी श्री स्वप्निल आळेकर यांनी ती व्यवस्था केली आणि ठाण्यावरून श्री विश्वास नागरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
या दहा दिवसाच्या शिबिराला माझी प्रियंका गायधने नावाची मुलगी होती. ही त्यांच्या ऑनलाइन भाषणाने खूपच प्रभावित झाली .ती म्हणाली. मला विश्वास नांगरे पाटलांना भेटावयाचेच आहे. ती तेव्हा अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. मी विश्वास नांगरे पाटलांना फोन लावला. ते म्हणाले काठोळे सर आम्ही खूपच व्यस्त असतो. ही मुलगी अमरावतीहून येणार. हिला वाट पाहावी लागणार .मी प्रियंकाला हे सगळे सांगितले .प्रियंका हट्टाला पेटली. म्हणाली मला भेटावयाचेच आहे. शेवटी विश्वास नांगरे पाटलांनी तिला भेटण्याची तारीख आणि वेळ सांगितली. त्याप्रमाणे ती मुंबईला गेली आणि तिची आणि साहेबांची भेट झाली .तिच्या आनंद गगनात मावेनासा झाला.तिने विश्वास नांगरे पाटलांची मुलाखत घेतली .ती आम्ही आमच्या शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर या पुस्तकामध्ये छापली. एका विद्यार्थ्याला विश्वास नांगरे पाटील यांनी वेळ देऊन आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला होता. अशा हजारो मुलांचे भवितव्य विश्वास नांगरे पाटलांनी घडविले आहे.
माझे नुकतेच महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री विकास खारगे आयएएस यांच्या हस्ते दीपस्तंभ हे पुस्तक दिनांक 22 मे रोजी प्रकाशित झाले. त्यामध्ये मी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. वेळोवेळी मी त्यांच्या कार्यावर लिहीत होतो. ते लातूर असो की अहिल्या नगरला किंवा ठाणे येथे किंवा कोल्हापूर येथे त्यांना भेटावयास जातच होतो आणि आता तर ते आमच्या विदर्भातच नागपूरला आलेले आहेत.
त्यांचे मन में है विश्वास हे पुस्तक खूपच गाजले. हजारो प्रति हातोहात विकल्या गेल्या. विशेष म्हणजे त्यांनी खूप वर्षांपूर्वी बारामती येथे शारदा प्रतिष्ठान मध्ये दिलेले व्याख्यान खूपच गाजले. ते व्याख्यान म्हणजे त्याकाळच्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ होते. आपल्या या व्याख्यानामध्ये श्री विश्वास नांगरे पाटील यांनी ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना अतिशय प्रोत्साहनपर भाषण दिले. त्या भाषणाचा लाभ करोडो लोकांनी घेतला. अनेक युवक त्यातून प्रेरणा घेऊन आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकारी झाले. याचं श्रेय श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या व्याख्यानालाच द्यावे लागेल .त्या काळात इंटरनेट व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडिया फार कमी होता. पण त्या काळात विश्वास नांगरे पाटलाच्या भाषणाने क्रांती केली असेच म्हणावे लागेल.
आज नागपुरात ते पोलीस आयुक्त म्हणून आले आहेत. त्यांचे स्वागत आहे. मिशन आयएएसच्या उपक्रमात ते आता प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील व नवीन पिढीला मार्गदर्शन करू शकतील याचा विश्वास आहे. मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
