संख्याशास्त्र : विद्यार्थ्यांसाठी शाश्वत करिअरचा मार्ग
२९ जून – राष्ट्रीय संख्याशास्त्र दिनानिमित्त विशेष
वैभववाडी
आज, २९ जून रोजी देशभरात २० वा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भारतीय संख्याशास्त्राचे जनक डॉ. पी. सी. महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी भारत सरकारने “प्रशासकीय माहिती (Administrative Data) – आकडेवारीचे सामर्थ्य व क्षमता उघड करणे” ही संकल्पना जाहीर केली असून, शासनाच्या धोरणनिर्मितीपासून सार्वजनिक योजनांच्या मूल्यमापनापर्यंत आकडेवारीचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन, सोशल मीडिया, ऑनलाइन खरेदी आणि विविध मोबाईल ॲप्सचा वापर करत आहे. या माध्यमांतून निर्माण होणाऱ्या प्रचंड माहितीचे विश्लेषण करून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची उभारणी केली जात आहे. या सर्व प्रगत तंत्रज्ञानाचा पाया हा संख्याशास्त्र आणि गणित या विषयांवर आधारित आहे.
संख्याशास्त्रामुळे भूतकाळातील आणि वर्तमानातील माहितीचे विश्लेषण करून भविष्याचा अंदाज बांधणे शक्य होते. वैद्यकीय क्षेत्रातील रोगनिदान, अभियांत्रिकी, कृषी, अर्थव्यवस्था, उद्योग, मनोरंजन, हवामान अंदाज, रोबोटिक्स, इमेज रिकग्निशन अशा अनेक क्षेत्रांत संख्याशास्त्राचा प्रभावी वापर होत आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बहुविषयक शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी संख्याशास्त्र व गणिताचे भक्कम ज्ञान आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विषयाकडे केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नव्हे, तर भविष्यातील शाश्वत करिअरचा मार्ग म्हणून पाहणे आवश्यक आहे.
संख्याशास्त्र म्हणजे केवळ आकडे मोजण्याचा विषय नसून, आकड्यांच्या माध्यमातून वास्तव अधिक स्पष्टपणे समजून घेण्याचे प्रभावी शास्त्र आहे. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल “तो उंच आहे” असे म्हणालो, तर प्रत्येकाच्या मनात उंचीची वेगवेगळी कल्पना निर्माण होऊ शकते. परंतु, “त्याची उंची सुमारे सहा फूट आहे” असे सांगितल्यास त्या व्यक्तीची उंची नेमकी किती आहे याची स्पष्ट कल्पना येते. म्हणजेच, कोणत्याही गोष्टीचे संख्यात्मक स्वरूपात मांडलेले वर्णन अधिक अचूक, वस्तुनिष्ठ आणि सर्वांना समान अर्थाने समजणारे असते. म्हणूनच शासन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, शेती, अर्थव्यवस्था आणि संशोधन या सर्व क्षेत्रांमध्ये निर्णय घेताना आकडेवारीला विशेष महत्त्व दिले जाते.
संख्याशास्त्राच्या साहाय्याने भूतकाळातील माहितीचे विश्लेषण करून वर्तमान परिस्थितीचे आकलन करता येते आणि त्याच्या आधारे भविष्याचा विश्वासार्ह अंदाज बांधता येतो. हवामानाचा अंदाज, शेतीचे नियोजन, रोगांचा प्रसार, लोकसंख्या वाढ, उद्योगातील मागणी, शेअर बाजारातील कल, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि मशीन लर्निंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्येही संख्याशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. आज संगणक कितीही प्रगत असला तरी त्यामागील तर्कशास्त्र, संभाव्यता, डेटा विश्लेषण आणि गणिती संकल्पना या संख्याशास्त्रावरच आधारित आहेत.
एखादे सॉफ्टवेअर वापरणे ही एक गोष्ट आहे; परंतु नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, समस्यांचे विश्लेषण करून त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधणे आणि समाजासाठी उपयुक्त संशोधन करणे यासाठी संख्याशास्त्राचे भक्कम पायाभूत ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता विषय म्हणून नव्हे, तर भविष्यातील संशोधन, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, वैद्यकीय विज्ञान, अभियांत्रिकी आणि विविध शासकीय व खासगी क्षेत्रांतील उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने संख्याशास्त्राचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात संख्याशास्त्र हा केवळ एक विषय नसून, विद्यार्थ्यांसाठी शाश्वत, भविष्याभिमुख आणि अमर्याद संधी उपलब्ध करून देणारा करिअरचा प्रभावी मार्ग ठरत आहे.
संख्याशास्त्र विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) भारतीय सांख्यिकी सेवा (Indian Statistical Service) मध्ये अधिकारी होण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात जिल्हा सांख्यिकी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, नियोजन अधिकारी, विस्तार अधिकारी अशा विविध पदांवर करिअर करता येते. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, बिझनेस ॲनालिस्ट, स्टॅटिस्टिशियन, बायो-स्टॅटिस्टिशियन यांसारख्या उच्च वेतनाच्या आणि प्रतिष्ठेच्या संधी उपलब्ध आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात संख्याशास्त्र विषयाचा गांभीर्याने विचार करून या क्षेत्रातील करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण पाटील, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी यांनी राष्ट्रीय संख्याशास्त्र दिनानिमित्त केले आहे.
