शाळेचा पहिला दिवस…
*प्रार्थना, वृक्षारोपण, कविता, एस एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याने गाजला*
पिंपरी
न्यू इंग्लिश स्कूल, माण, तालुका मुळशी आणि दिलासा संस्था, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक १५ जून २०२६ हा शाळेचा पहिला दिवस प्रार्थना, वृक्षारोपण, कविता सादरीकरण, एस एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याने गाजला; आणि विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, मान्यवर अभ्यागत या सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
न्यू इंग्लिश स्कूल, माण इथल्या शाळेतील पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. रंगीत खडूंनी फळ्यावर कार्यक्रमाची रूपरेषा लिहिली. सोनचाफा आणि बकुळीचे झाड लावण्यासाठी खड्डे तयार केले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी हळद, कुंकू, निरांजन, फुलाचे ताट सजवले; आणि शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्साहात जय्यत तयारी केली होती. पिंपरी – चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्घाटक शिवव्याख्यात्या सुलभा सत्तुरवार तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी, गझलकार सुहास घुमरे होते. ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, दिलासा संस्थेचे सुभाष चव्हाण, लेखक नारायण कुंभार, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, मुरलीधर दळवी, मुख्याध्यापक अंबादास रोडे, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, उद्योजक संदीप ओझरकर, ग्रामपंचायत सदस्य पंडित गवारे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुभाष चव्हाण यांनी शंखनाद करून भक्तिमय वातावरण निर्मिती केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थना एकसुरात डोळे मिटून म्हटली. संभाजी थिटे यांनी प्रास्ताविक केले. वैकुंठवासी मुरलीधर कंक (मास्तर) यांच्या स्मरणार्थ शाळेत यावर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना शाल, पुस्तक, प्रशस्तिपत्र आणि रोख पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये शुभम अंकुश माने (प्रथम क्रमांक), आरती किशोर गोसावी (द्वितीय क्रमांक), रितेश तुकाराम मैत्रे (तृतीय क्रमांक), अनुराधा विठ्ठल शेंडगे (चतुर्थ क्रमांक) आणि रौनक उदलसिंग राठोड (पाचवा क्रमांक) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता. याप्रसंगी शिवव्याख्यात्या सुलभा सत्तुरवार यांनी, ‘विद्यार्थ्यांनी एकाग्र होऊन अभ्यास करावा. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतर छान छान पुस्तकांचे वाचन करावे. आहार, विहार, व्यायाम अन् निद्रा याचा समतोल राखावा!’ अशा शब्दांतून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. प्रमुख पाहुणे सुहास घुमरे यांनी शालेय आठवणी जागवत कवितांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक अंबादास रोडे, नारायण कुंभार, कवयित्री राधाबाई वाघमारे, सुरेश कंक यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शोभा जोशी यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गेय कवितांचे सादरीकरण केले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल, माण शाळेच्या ग्रंथालयाला पिंपरी – चिंचवड शहरातील साहित्यिकांनी काही पुस्तके भेट स्वरूपात दिली. शीतल टकले, विजय भांगरे, मंगल गायकवाड, शुभम गायकवाड, ज्योती गायकवाड, बाळू जाधव, सुदाम केळकर आणि टी.सी.एस. कंपनीचे प्रतिनिधी यांनी संयोजनात पुढाकार घेतला. गोकुळ गायकवाड यांनी बहारदार सूत्रसंचालन केले; तर साधना शिंदे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
