पेपरफुटीविरोधात युवासेनेचे अनोखे आंदोलन; कुडाळमध्ये उघडणार ‘पेपर विक्री केंद्र’
१ जुलै रोजी उपरोधात्मक आंदोलनातून सरकारचा निषेध; न्यायालयीन चौकशी व दोषींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईची मागणी
कुडाळ
देशात आणि राज्यात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याचा आरोप करत युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळमध्ये एक अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. परीक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा आणि भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवार, दि. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील आठवडे बाजारात एस.टी. स्थानकाजवळ उपरोधात्मक ‘भ्रष्ट परीक्षा महामंडळ अधिकृत पेपर विक्री केंद्र’ उभारण्यात येणार आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात बाजारातील भाजी किंवा कपड्यांच्या स्टॉलप्रमाणे पेपर विक्री केंद्राची उभारणी केली जाईल. या स्टॉलवरून फेरीवाल्यांच्या शैलीत लाऊडस्पीकरद्वारे उपरोधात्मक घोषणाबाजी करत NEET, MPSC आणि इतर परीक्षांच्या डमी प्रश्नपत्रिकांची प्रतीकात्मक ‘विक्री’ करण्यात येणार आहे. “अभ्यास करण्याची गरज नाही, पैसे आणा आणि थेट अधिकारी व्हा!” अशा उपरोधात्मक घोषणांद्वारे सरकारच्या कारभारावर टीका करण्यात येणार आहे.
या आंदोलनाद्वारे पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करून दोषींवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिला असून, या आंदोलनात शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
