You are currently viewing राजर्षी शाहू महाराजांचा जाहीरनामा आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाया : डॉ. सोमनाथ कदम

राजर्षी शाहू महाराजांचा जाहीरनामा आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाया : डॉ. सोमनाथ कदम

राजर्षी शाहू महाराजांचा जाहीरनामा आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाया : डॉ. सोमनाथ कदम

फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या व्याख्यानात प्रतिपादन; लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा सविस्तर उलगडा

मालवण

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार स्वीकारल्यानंतर अवघ्या बारा दिवसांत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या आधुनिक लोकशाही मूल्यांचा स्पष्ट पुरस्कार केला होता. भारतीय संविधानातील मानवतावादी मूल्यांची बीजे शाहू महाराजांच्या राज्यकारभारातच आढळून येतात. रयतेला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणकारी शासनव्यवस्था उभारणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतीय इतिहासातील अद्वितीय लोकराजे होते, असे प्रतिपादन कणकवली महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व लेखक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, मालवण यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नागेश कदम होते. व्यासपीठावर मंचाचे संस्थापक तथा माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, मालवण नगरपालिकेचे आरोग्य सभापती सिद्धार्थ जाधव, स. का. पाटील सिंधुदुर्ग मालवण महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, माजी तहसीलदार आनंद मालवणकर, प्रा. डॉ. दत्ता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कदम यांनी आपल्या व्याख्यानात राजर्षी शाहू महाराजांच्या लोकाभिमुख धोरणांचा आढावा घेताना सांगितले की, भारतातील ५६५ संस्थानांपैकी कोल्हापूर संस्थान हे आधुनिक लोकशाही मूल्यांवर आधारित आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारे एकमेवाद्वितीय संस्थान होते. शाहू महाराजांनी शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, महिला, बहिष्कृत समाज, आदिवासी, भटके-विमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत सामाजिक न्यायाचा पाया मजबूत केला.
शिक्षणाचा प्रसार, आरक्षणाची अंमलबजावणी, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि विज्ञाननिष्ठ शासनपद्धतीचा अवलंब ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. अंधश्रद्धा, दैववाद आणि रूढीवादी विचारांना छेद देत धर्मसत्तेचा राज्यकारभारावरील अनावश्यक हस्तक्षेप रोखल्यामुळेच कोल्हापूर संस्थानात आधुनिक कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या परंपरेचा वारसा पुढे नेत शाहू महाराजांनी “बहुजन सुखाय, बहुजन हिताय” या तत्त्वावर राज्यकारभार केला. शिक्षण, उद्योग, शेती आणि प्रशासन या क्षेत्रांत त्यांनी विकासाचा भक्कम पाया रचल्यामुळे ते शिवाजी महाराजांचे कृतिशील आणि लोकाभिमुख वारसदार म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत, असे मतही डॉ. कदम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार मीनाक्षी कांबळे यांनी मानले. व्याख्यानासाठी मालवण शहर व परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा