सावंतवाडी :
सावंतवाडी येथील ‘घे भरारी फाउंडेशन’च्या वतीने तालुका स्कूल शाळा क्रमांक १ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ या गंभीर समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचे मत फाउंडेशनच्या नूतन अध्यक्षा ज्योती दुधवडकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमादरम्यान शाळेसमोरील मैदानातील मोकळ्या जागेत विविध प्रकारच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये चाफा, चिकू, जांभूळ, जाम, सुपारी, अशोक आणि काजू अशा उपयुक्त झाडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ झाडे लावून न थांबता, ही रोपे व्यवस्थित जगविण्याची जबाबदारी शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थी, शिक्षक आणि ‘घे भरारी फाउंडेशन’च्या सर्व सभासदांनी मिळून स्वीकारली आहे. सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प यावेळी केला.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ‘घे भरारी फाउंडेशन’च्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा ज्योती दुधवडकर, उपाध्यक्षा मेघना राऊळ, कार्याध्यक्षा रिया रेडीज, सेक्रेटरी मेघा डुबळे, खजिनदार मेघना साळगावकर आणि सल्लागार शारदा गुरव उपस्थित होत्या.
त्यांच्यासोबत रेखा कुमटेकर, सलोनी वंजारी, वैष्णवी बांदेकर, संध्या पवार, मनीषा नवांगुळ, दीपा नेवगी आणि समीक्षा मडगावकर यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
