You are currently viewing योग संस्कृती

योग संस्कृती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*योग संस्कृती*

“योग कर्मसु कौशलम्” योग भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. आपल्याकडे योगाची हजारो वर्षांची परंपरा आहे. योग विद्येचे मूळ भारतीय असले तरी त्यातून मिळणारा संदेश हा विश्वव्यापी आहे. “योग” ही भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे.योग म्हणजे केवळ आसन करणे नाही. योगामध्ये मोठा गर्भितार्थ दडलेला आहे. स्वतःला समजून घेऊन प्रगती करण्यासाठी. आत्मा आणि शरीराची शुद्धता करण्यासाठी योग हा सर्वांग सुंदर मार्ग आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य तसेच आत्म्याचे संतुलन योगाने साधले जाते. दररोज योग आणि प्राणायामाचा सराव केला तर शरीर आणि मन दोन्ही बदलतात. दिवसाची सुरुवात शांततेत आणि कृतज्ञतेने केली तर दिवसाची ऊर्जा सकारात्मक राहते. आपला दिवस सूर्योदयापासून सुरू करून दोन मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घेऊन योगासने सुरू करावीत.रात्री योगनिद्रा घेतल्यास मन शांत होऊन झोप चांगली लागते. शरीर व मन तंदूरस्त राहून सुदृढ जीवन जगण्याचा मार्ग योग सांगतो त्यामुळेच दैनंदिन जीवनासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. आसन, प्राणायाम आणि आहार यामध्ये यम- नियमाचा योग्य उपयोग केल्यास त्याचा दैनंदिन जीवनात खूप चांगला परिणाम होतो. उत्तम आरोग्यासाठी दिवसातील ठराविक वेळ काढलाच पाहिजे.
योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्या योग थेरपीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे त्यावरून असे लक्षात आले की अनेक आजारांवर योग परिणामकारक आहे. मनशांतीसाठी योगाशिवाय पर्याय नाही. आपले मन कायम भटकत असते, चित्त भानावर नसते. ते भानावर आणण्यासाठी योग उपयुक्त आहे. चित्तवृत्तींना दूर करणे म्हणजेच योग आहे असे योगाचे संस्थापक पतंजली सांगतात.
२१जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. २१ जून २०२५ ला नागपूरकर तरुणांनी एका विक्रमाची नोंद केली ४५ मिनिटांच्या योग सत्रात तब्बल १६९ देशांमध्ये सात लाख ५२ हजार ७४ नागरिकांनी एकत्र योग करत विक्रम रचला. योग करणे प्रत्येकाला अगदी सहज शक्य आहे. याद्वारे होणारे परिणाम परिवर्तन घडवणारे ठरतील अशी भावना ‘हॅबिल्ड’ चे सहसंस्थापक सौरभ बोथरा यांनी व्यक्त केली. हा अशक्यप्राय वाटणारा विक्रम ‘ऑफिशियल वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदवला गेला. बोथरा यांनी प्रत्येक नागरिकांना योग करण्याची सवय लागावी म्हणून ‘हॅबिल्ड’ची स्थापना केली असून या अंतर्गत हा पाचवा जागतिक विक्रम आहे. योग दिनाच्या पूर्व संध्येला त्यांनी ‘हर घर योग’ ही चळवळ राबवली आणि योग जागतिक स्तरावर उंचावण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी ‘हॅबिल्ड’ ने २०२३ मध्ये एक लाख ३४ हजार ५७ नागरिकांसह ‘वर्ल्ड रेकॉर्ड युनियन’ मध्ये विक्रमाची नोंद केली. त्या पाठोपाठ दोन लाख ८७ हजार ७११ आणि पाच लाख ९९ हजार १६२ सहभागी सदस्यांसह ‘वर्ल्ड रेकॉर्ड युनियन’ चाच किताब मिळवला जानेवारी २०२४ मध्ये दोन लाख ४६ हजार २५२ प्रेक्षकांसह यूट्यूब वर ‘योगा लाईव्ह स्ट्रीमिंग’ साठी सर्वाधिक प्रेक्षकांच्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ची नोंद केली.
योगासने ही भारताकडून जगाला मिळणारे सर्वात मोठे क्रीडा योगदान ठरू शकते.योगासनाला जागतिक स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून स्थापित करण्यासाठी भारत पुढाकार घेत आहे. जागतिक योगासन चॅम्पियनशिप ही आपल्या युवाशक्तीचे, संस्कृतीचे आणि उदयोन्मुख जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताला अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
योगासने ही कुठल्याही वयाच्या स्त्री पुरुषांना चालण्यासारखी असतात. यामध्ये श्वासाची लयबद्धता शरीरातल्या सगळ्या चयापचय क्रियांना सुधारायला मदत करते. यात केलेल्या प्राणायामामुळे मानसिक स्थिरता वाढते. अभ्यासात किंवा कामात लक्ष केंद्रित करणे सोपं जातं.प्रत्येक केल्या जाणाऱ्या आसनामध्ये शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या मसल लिगामेंट इत्यादी वरती काम करणं सोपं जातं. योगासनांची सुरुवात जितक्या कमी वयामध्ये केली जाते तेवढे उत्तम असतं. उंची वाढण्याच्या वयामध्ये योगासने केल्यास हाडांची व इतर धातूंची व्यवस्थित वाढ व्हायला मदत मिळते. आपल्या शरीरातल्या स्नायू प्रमाणे आपल्या मनाचेही स्नायू यामुळे बळकट व्हायला मदत होते.
योगासनांच्या व्यायाम हे एक बहुआयामी साधन आहे जे आपल्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक औषधांसारखे काम करते. नियमितपणे केले तर जुने आजार उद्भवण्याचा धोका कमी करू शकतो. आपले मानसिक आरोग्य, जीवनमान आणि जीवनशैली सुधारू शकतो.

सौ. अनघा अनिल कुळकर्णी
वारजे
पुणे. 🙏९३२३४९१११३

प्रतिक्रिया व्यक्त करा