अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन; ग्राहकांना बाहेर काढून मॉल बंद करत परवाने, साठा व कागदपत्रांची कसून चौकशी
कुडाळ :
कुडाळ येथील ‘आपला बाजार’ मॉलवर अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI)च्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई करत तपासणी सुरू केली. या कारवाईमुळे कुडाळ शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, FSSAIचे पथक अचानक मॉलमध्ये दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर मॉलचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आतमध्ये चौकशी आणि तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
सध्या पथकाकडून मॉलच्या व्यवस्थापनासह संपूर्ण कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असून, अन्नपदार्थांचे परवाने, उपलब्ध साठा, अन्न सुरक्षा नियमांचे पालन तसेच संबंधित कायदेशीर कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार आणि मोठ्या थाटामाटात कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या भव्य मॉलचे उद्घाटन पार पडले होते. उद्घाटनानंतर अल्पावधीतच झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, तपासणीचा अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नसून, FSSAIच्या पथकाकडून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कारवाईनंतर मॉल व्यवस्थापनाची भूमिका काय राहणार आणि तपासणीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
