*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धुडूमधाड तू ये ना पावसा..*
धुडूमधाड तू ये रे पावसा तरसवशी तू कसा
ढग पालख्या घेऊन ये ना ओत ना भसा भसा..
भेगा पडल्या माय मातीला हुळहुळले रे अंग
कुठे तू रमला कळत नाही झाला कुठे तू दंग..
मागमूस ना तुझा जरा ही नाही ठाव ठिकाणा
बघना जरा तू येऊन खाली झाला किती खकाणा
तलाव आटले विहिरी आटल्या सैरावैरा पक्षी
जरा दिसेना आकाशी रे ढगहत्तींची नक्षी..
पाणी पाणी झाला जीव रे धरणे आटली सारी
असाच जरा का रूसला राजा जगणे होईल “भारी”
तुझ्यावाचूनी काही ना फुलते जीवन होते ठप्प
बरसू दे ना तुझ्या घागरी नको बसू तू गप्प..
कडकडाड कर धडधडाड कर तांडव कर तू आता
तुझ्यावाचूनी तुला माहिती कुणी नाही रे त्राता
नकोस मारू पाण्यावाचून नाही तुझी ती ख्याती
आसुसली बघ तुला भेटण्या मायमाऊली माती..
तुझा तूच तू येतो राजा बोलावणे लागत नाही
असाकसा तू निवांत झाला कर ना जराशी घाई
तारक आहे मारक आहे करून घे मनमानी
तुझ्यावाचूनी जरा न होते वसुंधरा ती धानी…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
( ९७६३६०५६४२)
