शेअर रक्कम १०% वरून ५% करण्याचा निर्णय; १००% ऑनलाईन प्रणाली लागू — अध्यक्ष मनीष दळवी
१००% कर्ज वसुली करणाऱ्या ३४ विकास संस्थांचा कुडाळात गौरव
कुडाळ / (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर १०.५० टक्के असेल, तर विकास सहकारी संस्थेमार्फत शेतकरी सभासदाने गृहकर्ज घेतल्यास त्याला ९.५० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व प्रकारच्या कर्जावर विकास संस्थेच्या सभासदांसाठी १ टक्का कमी व्याजदर ठेवण्यात आला असून, कर्जासाठी आवश्यक शेअर रक्कम १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. मनीष प्रकाश दळवी यांनी दिली.
कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळाव्यात’ ते बोलत होते.
अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की, कर्ज मंजुरीसाठी पूर्वी ९० दिवसांचा कालावधी लागत होता. आता संगणकीकरणामुळे ही प्रक्रिया फक्त ७ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवीन कार्यपद्धती अशी :
१. अपलोड त्याच दिवशी : सचिवांनी कागदपत्रे स्कॅन करून त्याच दिवशी बँकेच्या पोर्टल/अॅपवर अपलोड करायची आहेत. यासाठी तालुका किंवा जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
२. संचालक मंडळ बैठकीची गरज नाही : चेअरमन व सचिव यांच्या सहीने ऑनलाईन कर्ज मागणी नोंदवता येणार आहे.
३. तात्काळ नोंद : कर्जाची मागणी नोंदवल्या क्षणीच ती तालुका कार्यालय तसेच मुख्य कार्यालयाला दिसणार आहे.
४. ४८ तासांत पाहणी : विकास अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी आवश्यक असल्यास ती ४८ तासांत करण्यात येईल. त्यानंतर त्यांचे मत २४ ते ४८ तासांत पोर्टलवरच नोंदविले जाईल. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनेच मुख्य कार्यालयाकडे पाठविला जाईल.
५. २४ तासांत मंजुरी : मुख्य कार्यालयात प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत मंजुरी पत्र पोर्टलवर अपलोड केले जाईल.
६. ५ लाखांपर्यंत थेट अधिकार : ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला थेट मंजुरी देण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संचालक मंडळाची कार्योत्तर मंजुरी नंतर घेतली जाईल.
७. २४ तासांत कर्ज वाटप : मंजुरीनंतर आवश्यक कागदपत्रे थेट ब्रँच मॅनेजरकडे देण्यात येतील आणि २४ तासांत कर्जाची रक्कम सभासदाच्या खात्यात जमा केली जाईल.
कर्ज उपसमितीमध्ये चेअरमन, व्हा. चेअरमन तसेच १-२ संचालकांचा समावेश करून धावत्या बैठकीद्वारे कर्ज मंजुरी देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. “वेळेची व व्याजदराची मर्यादा कमी करून शेतकऱ्याला त्रास न होता घरबसल्या कर्ज देण्याचा प्रयत्न आहे,” असे दळवी यांनी सांगितले.
पूर्वी विकास संस्थांमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. केंद्र शासनाने संगणकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे आता प्रत्येक संस्थेचा तीन दिवसांतील व्यवहार, ताळेबंद व जमा रक्कम सचिव जागेवर नसला तरी विकास अधिकारी, मुख्य कार्यालय, नाबार्ड तसेच राज्य व केंद्र शासनाला एका क्लिकवर पाहता येते. यामुळे आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता आली आहे, असे अध्यक्ष दळवी यांनी सांगितले.
सभासदाने प्रश्न विचारताच सचिवाने एका क्लिकवर माहिती घेतल्यास त्याची प्रिंटही उपलब्ध होते. सर्व संस्थांचे बॅलन्स शीट व आर्थिक पत्रके आता समान पद्धतीने तयार होतात. पुढील काळात आधार, पॅन व सातबारा लिंक करून सभासदाला किती कर्ज मिळू शकते, याची माहिती सचिव एका क्लिकवर देऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“६० ते ७० टक्के संस्थांमध्ये सचिवांचा पगार ५ ते ७ हजार रुपये आहे. प्रवास व पेट्रोलचा खर्च केल्यानंतर महिनाअखेरीस १-२ हजार रुपयेच उरतात. त्यामुळे अपेक्षित पद्धतीने काम होत नव्हते. राज्य शासनाकडे मागणी केल्यानंतर सहकार कायद्यात सुधारणा झाली आहे. सचिव यंत्रणा सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.
दि. ३० जून २०२६ अखेर बँकेच्या कर्जाची १००% वसुली करणाऱ्या ३४ विकास संस्थांचा अध्यक्ष मनीष दळवी, संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये व आत्माराम ओटवणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तेंडोली, माणगाव, कर्याद नारूर, नेरूर, आंदुर्ले, घोटगे, निवजे, पाट, कुडाळ पंचक्रोशी, पणदूर वेताळ बांबार्डे, कडावल, माड्याची वाडी, श्री लिंगेश्वर सोनवडे, कसाल, हिर्लोक, सरंबळ, हुमरमळा, झाराप, डिगस आकेरी, बांबुळी, तुळसुली, चेंदवण, वालावल कृषी संघ, श्री महादेव कवठी, घावनळे, वालावल, वाडी वरवडे, साळगाव, केरवडे, पांग्रड, आवळेगाव इत्यादी संस्थांचा यामध्ये समावेश आहे. वाडी वरवडे विकास संस्थेचा संस्था स्तरावर १००% कर्जवसुली केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर, रविंद्र मडगांवकर, चंद्रकांत माधव, भा.के. वारंग, दिपक नारकर, कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बाबा गावडे, के. बी. वरक, वसंत हडकर, शाम सरमळकर, निलेश कनयाळकर, संजय परब आदी उपस्थित होते. यावेळी कुडाळ तालुक्याच्या वतीने अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार करण्यात आला.
