You are currently viewing एकल पालक मुलींना शालेय साहित्य पुरविणार!

एकल पालक मुलींना शालेय साहित्य पुरविणार!

अनुराधा नारकर यांची माहिती; जि. प. महिला व बालविकास समितीच्या मासिक सभेत विविध विषयांवर चर्चा

सिंधुदुर्गनगरी : अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या अनाथ तसेच एकल पालक मुलींना १५०० रुपयांपर्यंतचे शालेय साहित्य पुरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालविकास सभापती अनुराधा नारकर यांनी दिली. जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा महिला व बाल विकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतिक उगारे, सदस्य दीपलक्ष्मी पडते, अवनी तेली, सुप्रिया मेस्त्री, आरती पाटील, हर्षदा वाळके, क्षमा हडकर तसेच सर्व तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेत जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची ३० तर कमी वजनाची ४११ बालके असल्याची बाब समोर आली. या गंभीर परिस्थितीबाबत सदस्य दीपलक्ष्मी पडते यांनी महिला व बालविकास विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. कुपोषणमुक्तीसाठी पालकमंत्रीदेखील आग्रही असल्याने योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष परिणामकारकपणे राबवाव्यात, प्रशासनाकडून कोणतीही कमतरता राहू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्थांची निवड करण्याबाबतही चर्चा झाली. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली.

तसेच जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व अंगणवाड्यांचे कामकाज आता पेपरलेस पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. आयुक्त कार्यालयाकडून त्याबाबत आवश्यक निर्देश प्राप्त झाले असून जिल्ह्यातील १५३९ अंगणवाड्यांचे कामकाज डिजिटल व पेपरलेस पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतिक उगारे यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा, कुपोषण निर्मूलन, मुलींच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठीचे उपक्रम तसेच अंगणवाडी व्यवस्थेचे आधुनिकीकरण या विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा